पंढरपूर/सोलापूर| कार्तिकी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते होत असते. परंतु सकल मराठा समाजाने या शासकीय महापूजेला विरोध केल्याने पेच निर्माण झाला होता. जिल्हा प्रशासनाने सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाशी चर्चा करून समाजाच्या पाचही मागणी मान्य केल्याने मराठा समाजाने आंदोलन मागे घेतले असून दिनांक 23 नोव्हेंबर 2023 रोजी कार्तिकी यात्रेनिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शासकीय महापूजा होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.

पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृह येथे जिल्हा प्रशासन व सकल मराठा समाजाचे शिष्टमंडळ यांची संयुक्त बैठक घेण्यात आली, त्याप्रसंगी जिल्हाधिकारी आशीर्वाद बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, प्रांताधिकारी गजानन गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले,मुख्याधिकारी डॉ.प्रशांत जाधव तसेच सकल मराठा समाजाचे प्रतिनिधी व अन्य मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सकल मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी कुणबी जातीच्या नोंदी वेगाने शोधणे, मराठा भवन बांधणे, सारथीचे उपकेंद्र सुरू करणे, मराठा विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृह बांधणे व मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री यांचा वेळ मिळणे या मागण्या करण्यात आल्या. त्यावर जिल्हा प्रशासन प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मराठा समाजाने केलेल्या उपरोक्त पाचही मागण्या तात्काळ मान्य केल्या.

प्रशासनाने घेतलेल्या सकारात्मक भूमिकेच्या अनुषंगाने सकल मराठा समाजाने उपमुख्यमंत्री यांना शासकीय महापूजा करण्यास केलेला विरोध व आंदोलन मागे घेतले असून शासनाचे प्रतिनिधी म्हणून उपमुख्यमंत्री हे कार्तिकी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यास कोणतीही हरकत नसल्याचे समाजाच्या वतीने सांगण्यात आले.

जिल्हा प्रशासन प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सकल मराठा समाजाच्या प्रतिनिधीशी दुसऱ्यांदा बैठक घेऊन मराठा समाजाचे आंदोलन मागे घेण्याबाबत महत्वपूर्ण भूमिका बजावली. जिल्ह्यातील कुणबी पुरावे नोंदी गोळा करण्याची मोहीम गतीने सुरू असून त्यात अधिक गती यावी यासाठी सर्व संबंधित तहसीलदार व प्रांताधिकारी यांना सुचित करणार असल्याचे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले. त्याप्रमाणेच पंढरपूर येथे मराठा भवन बांधण्यासाठी पालकमंत्री यांच्याशी चर्चा करून लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. त्याप्रमाणेच प्रांताधिकारी यांना मराठा भवनसाठी जागा शोधण्याबाबत ही कळविण्यात आले असून बांधकामासाठी निधीची ही तरतूद करण्याचे प्रयत्न केले जातील असे त्यांनी सांगितले.

पंढरपूर येथे सारथी चे उपकेंद्र सुरू करण्याबाबत शासनाला लवकरच प्रस्ताव पाठविण्यात येणार असून त्यासाठी पाठपुरावाही केला जाईल. तसेच विद्यार्थी वस्तीगृह साठी ही प्रयत्न केले जाणार असून मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा करण्यासाठी सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाला उपमुख्यमंत्री महोदय हे वेळ देणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिली. त्यामुळे सर्व सकल मराठा समाजाचे प्रतिनिधी यांनी त्यांचे आंदोलन मागे घेत असल्याचे बैठकीत सांगितले.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version