माहूर, इलियास बावानी| तालुक्यात मायक्रो फायनान्स कंपन्यांची दादागिरी दिवसेंदिवस वाढत चालली असून, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) नियमांची सर्रास पायमल्ली होत आहे. या कंपन्या ग्रामीण महिलांकडून कर्जाची वसुली करताना माणुसकी व कायद्याचे भान विसरत आहेत.
गावोगावी फिरणारे फायनान्स एजंट कर्जदार महिलांना संध्याकाळी बोलावून घेतात आणि रात्री उशिरापर्यंत – अगदी दहा वाजेपर्यंत – त्यांना कर्ज फेडण्यासाठी ताटकळत बसवतात. अनेक वेळा महिलांना सार्वजनिक ठिकाणी अपमानित केले जाते, वसुलीसाठी दबाव टाकला जातो. यामुळे त्यांच्या आत्मसन्मानाला तडे जात असून मानसिक त्रासही वाढतो आहे.
⬛RBI च्या नियमांची उघडपणे पायमल्ली
RBI ने स्पष्टपणे निर्देश दिले आहेत की, फायनान्स कंपन्यांनी वसुलीच्या वेळा सकाळी ८ ते संध्याकाळी ६ या वेळेत मर्यादित ठेवाव्यात. तसेच वसुली करताना कोणत्याही ग्राहकाला धमकावणे, अपमानित करणे किंवा दबाव टाकणे गैरकायदेशीर आहे. मात्र याचे पालन होताना कुठेही दिसत नाही.
⬛स्थानिक प्रशासनाची उदासीनता
या प्रकारांबाबत स्थानिक प्रशासन, पोलीस आणि संबंधित विभागांनी वेळेवर हस्तक्षेप न केल्याने कंपन्यांचे फावते आहे. यामुळे गरीब व मध्यमवर्गीय महिलांच्या जगण्यात भरडपट्टी वाढत आहे.या पार्श्वभूमीवर संबंधित फायनान्स कंपन्यांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत. महिलांची सुरक्षितता आणि आत्मसन्मान राखण्यासाठी स्थानिक प्रशासनाने तातडीने लक्ष घालणे गरजेचे आहे.