श्रीक्षेत्र माहूर, इलियास बावानी| राष्ट्रीय महामार्गाच्या कंत्राटदाराच्या चुकीच्या कामामुळे वाहतूकदारांना प्रचंड त्रास होत असून शासकीय कामानिमित्त दि 18 रोजी 10 वाजता मालवाडा घाटातून माहूरचे तहसीलदार अभिजीत जगताप हे सेवा पंधरवडा निमित्त खेड्यापाड्यात कामानिमित्त जात असताना प्रचंड ट्रॅफिक जाममुळे तासभर रस्त्यावर ताटकळत उभे राहावे लागले. हि घटना कंत्राटदाराच्या प्रतिनिधी समक्ष घडली तरीही रंदा खोऱ्याने होत असलेल्या कामाला गती मिळाली नाही. नवरात्र उत्सवात येणाऱ्या भाविकांना याचा प्रचंड त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने कंत्राटदार आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कारभाराविषयी तीव्र संताप व्यक्त होत आहे.

दि 18 रोजी सेवा पंधरवड्या निमित्त अनेक गावातील पानंद रस्त्याची प्रकरणे निकाली काढणे व इतर कामासाठी तहसीलदार अभिजीत जगताप हे शासकीय वाहनाद्वारे मालवाडाच्या मध्य घाटात पोहोचले असता येथे दोन एस टी महामंडळाच्या बसेसना अरुंद रस्त्यावर जागा मिळाली नसल्याने बराच वेळ अडकल्या होत्या. त्यामुळे घाटाखाली जाणारे आणि घाटावरून माहूर शहरात येणाऱ्या शेकडो वाहनांना ताटकळत थांबावे लागले ट्राफिक जाम प्रचंड झाल्याने तहसीलदार अभिजीत जगताप यांनी माहूर पोलीस ठाण्यात दूरध्वनीवरून सदरील घटनेची कल्पना देऊन पोलिस आणि होमगार्ड यांना पाचारण करून ट्राफिक सुरळीत करायला लावली.
मालवाडा घाटात अनेक दिवसापासून राष्ट्रीय महामार्गाच्या कंत्राटदारांनी मशीन चा वापर न करता रंदा खोऱ्याने राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू ठेवल्याने गोगलगायिच्या गतीने सदरील काम घाटातून माहूरकडे सरकत असल्याने वाहनधारकांची प्रचंड कसरत होत असून दिवसातून तीन वेळा ट्राफिक जाम तर रात्री तासान तास ट्राफिक जाम होत आहे. सदरील कामाला गती द्यावी म्हणून वृत्तपत्रातून बातम्याही प्रसिद्ध झाल्या परंतु कंत्राटदार आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाला जागा आलेली नसल्याने भाविकांचे वाहनांना मोठा अपघात होऊन जीवित्त हानी होण्याची प्राधिकरण वाट पाहत आहे का असा सवाल यांनी निमित्ताने उपस्थित होत आहे.