नांदेड,अनिल मादसवार। सन २०२४-२५ या खरीप हंगामातील शंभर कोटी रुपयांची पीकविम्याची रक्कम मंजूर झाली असून, येत्या आठवडाभरात जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा होणार असल्याची माहिती नांदेडचे युवा खासदार रवींद्र वसंतराव चव्हाण यांनी दिली.
चालू खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने विम्याची रक्कम त्वरित मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत होती. विम्याची रक्कम वेळेवर मिळत नसल्याने शेतकऱ्यांत तीव्र संतापाची लाट उसळली होती. ही बाब लक्षात घेऊन शेतकऱ्यांना गतवर्षीच्या पीक विम्याची रक्कम तात्काळ मिळावी. यासाठी खा.रवींद्र चव्हाण यांनी संबंधित विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा करून शंभर कोटी रुपये मंजूर करण्यात यश मिळविले आहे.
त्यामुळे येत्या आठवडाभरात जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा होणार असल्यामुळे ऐन खरीप हंगामात शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार आहे. विम्याची रक्कम मिळवून देण्यासाठी खा.रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांंनी त्यांचे आभार मानले आहेत. आपण शेतकऱ्यांच्या सदैव पाठीशी असून, त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी यापुढेही सातत्याने प्रयत्न करू, शिवाय वेळोवेळी शासनाकडून आर्थिक मदतीसाठीही आपला पाठपुरावा सुरुच राहील, अशी ग्वाही खा.रवींद्र चव्हाण यांनी दिली.