काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस आनंद पाटील तूपदाळे यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयासमोर शेकडो नागरिक बसले आमरण उपोषणाला
तहसीलदारासह मुख्याधिकाऱ्यांना पाझर फुटला नसल्याने लाभार्थ्यावर उपोषणाची पाळी
श्रीक्षेत्र माहूर, इलियास बावानी| माहूर शहरात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुले मंजूर झालेल्या नागरिकांनी जुनी राहती घरे पाडून घरकुलांचे बांधकामे सुरु केली. शासनाचे अनुदानाचे पैसे लवकर मिळतील या अपेक्षेने अनेकांनी उधार उसनवार खासगी कर्जे घेऊन बांधकाम पूर्ण केले. परंतु घरकुलाचे संपूर्ण हप्ते अद्याप पर्यत मिळाले नाही. पहिल्या डीपीआर मधील ७६ लाभार्थ्यांना केवळ २ लाख ३० हजार रुपये मिळाले उर्वरित २० हजार रुपये आद्यप थकीत आहेत.
एकूण चार डीपीआर मधील ११०३ लाभार्थ्यापैकी १०२७लाभार्थ्यांचे ५० हजार रुपयाचे हप्ते अद्याप थकीत आहेत. अनुदानाचे पैसे वेळेत न मिळाल्याने लाभार्थी आर्थिक अडचणीत आले आहेत. त्यामुळे सदर लाभार्थ्यांचे थकीत असलेले हप्ते तातडीने लाभार्थ्यांना देण्यात यावे. अशी विनंती करूनही शासनाकडून घरकुल लाभार्थ्यांची रक्कम मिळाली नसल्याने तसेच आनंद पाटील तूपदाळे यांनी वारंवार मुख्यमंत्री पालकमंत्री खासदार आमदार जिल्हाधिकारी मुख्याधिकारी यांना निवेदन देऊनही दखल घेतली गेली झाली. त्यामुळे दि 22 रोजी तहसील कार्यालयासमोर काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस आनंद पाटील तूपदाळे यांच्या नेतृत्वात शेकडो नागरिकांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.
माहूर शहरातील अनेक नागरिकांकडे स्वतःच्या जागा उपलब्ध नाहीत अशा लाभार्थ्यांना शासनामार्फत पंतप्रधान आवास योजने अंतर्गत म्हाडा तर्फे घरकुल बांधकाम करण्यासाठी शासनामार्फत जागा उपलब्ध करून देऊन घरकुल योजनेचा लाभ देणे आवश्यक आहे.
शासनाच्या विविध आवास योजनेतील घरकुल लाभार्थ्यांना मोफत ५ ब्रास रेती उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार माहूर शहरातील आवास योजनांच्या ६०० लाभार्थ्यांना ५ ब्रास रेतीचे मोफत वाहतूक पास देणे आवश्यक असतांना माहूर तालुका प्रशासनाच्या नियोजनाच्या अभावाने केवळ ४० लाभार्थ्यांना मोफतमध्ये केवळ ३ ब्रास रेती ती सुद्धा अत्यंत निकृष्ट दर्जाची रोडा मिश्रित रेती उपलब्ध करून देण्यात आली.
५४० लाभार्थी आद्याप मोफत ५ ब्रास रेती पासून वंचित आहेत. करिता उर्वरित ५४० आणि आधीचे हजारो लाभार्थ्यांना तातडीने मोफत ५ ब्रास रेती उपलब्ध करून द्यावी यासह इतर मागणी घेऊन काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस आनंद पाटील दुगदाळे यांचे सह शेकडो नागरिक भर पावसाळ्यात माहूरच्या तहसील कार्यालया समोर आमरण उपोषणास बसले आहेत.