हिमायतनगर, अनिल मादसवार| संबंध भारतात ख्यातीप्राप्त असलेल्या हिमायतनगर (वाढोणा) येथील श्री परमेश्वर मंदिरात श्रावण मास उत्सवाची जय्यत तयारी पूर्ण झाली असून, ओम नमः शिवाय नाम जाप यज्ञाने दिनांक २५ पासून उत्सवाला सुरुवात होणार आहे. तसेच दिनांक २७ जुलै ते २१ ऑगस्ट दरम्यानच्या कालावधीत संगीतमय भागवत कथा, संगीतमय संत चरित्र कथा आणि संगीतमय शिवपुराण कथा असे विविध धार्मिक सप्ताह कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक कार्यक्रमांचा लाभ पंचक्रोशीतील भाविकांनी घ्यावा असे आवाहन श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.
प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी वाढोणा येथील जाज्वल्य देवस्थान श्री परमेश्वर मंदिरात श्रावण महिन्यात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन मंदिर कमिटीच्या पुढाकारातून करण्यात आले आहे. याची सुरुवात संगीतमय भागवत कथेने दि.२७ जुलै रविवार पासून होणार आहे. भागवत कथेने प्रवचन हभप. भागवताचार्य विदर्भ केशव परमपूज्य स्वामी सारंग चैतन्यजी महाराज रा. अमरावती यांच्या मधुर वाणीतून होणार आहे. भगवान श्रीकृष्ण लीलांचे वर्णन व प्रत्यक्ष झाकीच्या स्वरूपात दर्शन उपस्थित भाविकांना घडविले जाणार आहे. भागवत कथा सोहळा संपताच दि.०३ ऑगस्ट रोजी भव्य महाप्रसादाच्या पंगतीने समारोप केला जाणार आहे.
तर भव्य संगीतमय संत चरित्र कथेची सुरुवात दि.०५ ऑगस्ट रोज मंगळवारी होणार असून, कथेचं व्यासपीठ हभप प्रसिद्ध कीर्तनकार स्मिताताई आजेगावकर या सांभाळणार असून, त्यांच्या मधुर वाणीतुन संत चरित्र कथा सांगितली जाणार आहे. यातून विठू माऊलींसह, संत ज्ञानेश्वर, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम… आदींच्या गाथा सांगितली जाणार आहे. या कथेचा समारोप दि.१२ ऑगस्ट रोज मंगळवारी काल्याच्या कीर्तनाने होणार असून, त्यानंतर महाप्रसाद वितरित केला जाणार आहे.
त्यानंतर दि. १४ ऑगस्ट पासून संगीतमय शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले असून, शिवमहापुराण कथेचे प्रवक्ता श्री परमपूज्य बालयोगी गजेंद्र स्वामी महाराज यांच्या मधुर वाणीतून होणार आहे. या कथेतून भगवान महादेवाचे दिव्य दर्शन उपस्थित भाविकांना झाकीच्या माध्यमातून घडणार आहे. या कथेचा समारोप दि.२१ ऑगस्ट रोज गुरुवारी काल्याच्या कीर्तनाने होणार असून, त्यानंतर भव्य महाप्रसाद वितरित केला जाणार आहे. तीनही धार्मिक प्रवचन व संगीत कथा श्रवण कार्यक्रम येथील श्री परमेश्वर मंदिर सभागृहात दररोज दुपारी ०२ ते ०५ वाजेपर्यंत चालणार आहेत. दरम्यान कथेचं ध्वनी व्यवस्थापन माऊली सांऊड सिस्टीम, डोल्हारी हे करणार असून, पवित्र श्रावण मासात आयोजित विविध धार्मिक कार्यक्रमाचा लाभ शहरासह पंचक्रोशीतील भाविक – भक्तांनी घ्यावा असे आवाहन श्री परमेश्वर मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ, यांच्यासह सर्व संचालक मंडळींनी केले आहे.
२५ जुलै पासून महिनाभर अखंड ओम नमः शिवाय नाम जाप
श्रावण मासाच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच दिनांक २५ जुलै पासून येथील श्री परमेश्वर मंदिरात अखंड “ओम नमः शिवाय” नामाचा जाप केला जाणार आहे. दत्त संस्थान पिंपळगाव येथील परमपूज्य बालयोगी व्यंकट स्वामी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली श्रावण मासाची सुरुवात ते शेवटच्या दिवशीपर्यंत अखंडित ओम नमः शिवाय नामाचा जाप होणार आहे. या नामजाप यज्ञात शहरातील व ग्रामीण भागातील महिला पुरुष भाविक सहभागी होऊन तिसऱ्या वर्षीचा यज्ञ जास्तीत जास्त संख्येने सामील होऊन पूर्ण करावा असं आवाहन त्यांनी केलं आहे.