मुंबई| शैक्षणिक सवलती, पदोन्नतीतील आरक्षण, आणि एकूणच मागासवर्गीयांची प्रगती, विकास ह्या करीता अर्थसंकल्पातील अनुसूचित जाती जमातीचा निधी (वाटा), अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे अर्थसंकल्पातील अनुसूचित जातीचा वाटा मिळण्यासाठी, शैक्षणिक सवलती मिळवण्यासाठी व पदोन्नतीतील आरक्षण लागु करणे. ह्यासहअन्य मागण्यासाठी १५ जुलै रोजी विधीमंडळावर मुंबई येथे प्रचंड धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाचे नेतृत्व भारतीय बौद्ध महासभेचे कार्य अध्यक्ष डॉ भिमराव यवंतराव आंबेडकर हे स्वतः करणार आहेत.
सविस्तर वृत्त असे की, विधान परिषदेचे माजी सभापती वि स पागे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने केलेल्या शिफारशीनुसार २१ जून १९७९ रोजी अनुसूचित जातीच्या प्रगतीसाठी अर्थसंकल्पात १५ टक्के निधी राखून ठेवण्याबाबत शासन निर्णय काढण्यात आला होता. मात्र गेल्या ४५-४६ वर्षात याची अंमलबजावणी झालीच नाही. उलट अनुसूचित जाती जमातीसाठीचा निधी इतरत्र वळवला जात आहे. याबाबत स्वतः सामाजिक न्याय मंत्री जाहीरपणे बोलत आहेत. हा राज्यातील अनुसूचित जाती जमातीवर केलेला राज्य सरकार पुरस्कृत अन्याय आहे. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने कर्नाटक, आंध्र, तेलंगणा राज्यांप्रमाणे कायदा करून, हा निधी इतरत्र वळवला जाणार नाही, याची खात्री द्यावी. अशी मागणी दिनांक ४/७/२०२५ रोजी मुंबईत आंबेडकर भवन येथे झालेल्या आयबीसेफ व इतर समाज संघटना, कार्यकर्ते यांच्या बैठकीत राज्य सरकारला करण्यात आली आहे.
त्यामुळे राज्य सरकारने तत्कालीन शासन निर्णयाची अंमलबजावणी केली पाहिजे, त्याकरिता हा निधी (आमचा वाटा) इतरत्र वळवला जाणार नाही. याकरिता कायदा करून, अनुसूचित जाती जमातींच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी सरकार सक्षम आहे. असे दाखवून दिले पाहिजे. असे बैठकीच्या माध्यमातून आयबीसेफच्या वतीने सरकारला आवाहन करण्यात येत आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनावर १५ जुलै रोजी आझाद मैदान मुंबई येथे दुपारी १ वाजता धरणे आंदोलन करण्याचे सर्वानुमते ठरले. आयबीसेफचे अध्यक्ष सुनिल निरभवणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या बैठकीत सरचिटणीस अँड एस के भंडारे, कोषाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, प्रा. संजय अभ्यंकर,
सौ.अस्मिता अभ्यंकर, दीपक दीपंकर, अंबरसिंग चव्हाण,अँड. बुद्ध भूषण राजरत्न,संदीप सातपुते,संजय गांगुर्डे,आदेश जगधने, शाहिर अशोक कांबळे, गौतम कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते . त्यानंतर भारतीय बौद्ध महासभेचे ट्रस्टी राष्ट्रीय कार्याध्यक्ष व समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ भीमराव य आंबेडकर यांची भेट घेण्यात आली. त्यावेळी त्यांनी या समाजाच्या प्रश्नावर आयोजित केलेल्या आंदोलनास पाठिंबा दिला. व मुंबई येथे होत असलेल्या आंदोलनास उपस्थित राहणार असल्याची माहिती दिली. आयबीसेफचे सरचिटणीस व भारतीय बौद्ध महासभेचे ट्रस्टी राष्ट्रीय उपाध्यक्ष अँड एस के भंडारे यांनी ही माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.