नांदेड| जिल्हा परिषदेच्या वित्त विभागातर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांचे सन २०२४-२५ चे भविष्य निर्वाह निधी (GPF) विवरणपत्र संगणकीकरण करण्यात आले असून, या नव्या सुविधा प्रणालीचे लोकार्पण मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये करण्यात आली.
या प्रणालीव्दारे GPF विवरणपत्रे zpngpf.in या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहेत. शिक्षक कर्मचाऱ्यांनी आपला आधार लिंक असलेला मोबाईल नंबर आधी नोंदवून, प्रवर्ग व GPF क्रमांक टाकल्यानंतर OTP प्राप्त करून विवरणपत्र प्राप्त करू शकतील. या विवरणपत्रांना बारकोडसह PDF स्वरूपात प्रणालीवर पाहता आणि डाऊनलोड करता येणार आहे.
या डिजिटल पायाभरणीबद्दल समाधान व्यक्त करत मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी वित्त विभागाचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिवप्रकाश चन्ना, लेखाधिकारी विशाल हिवरे तसेच सर्व संबंधित कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. या लोकार्पण प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे आणि विविध विभागप्रमुख उपस्थित होते. शिक्षक संघटनांनी या उपक्रमा बद्दल समाधान व्यक्त करत वित्त विभाग तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांचे आभार मानले आहेत.