नांदेड| इंग्लंडमध्ये होणाऱ्या अंडर १९ कौंटी क्रिकेट सामन्यासाठी नांदेडचा सुुपुत्र इशान अनंत बासरकर याची निवड झाली आहे. याबाबत अधिकृत पत्र ही संबंधीतांकडून प्राप्त झाले आहे. कौंटी स्पर्धेत निवड झालेला अलिकडच्या काळातील तो नांदेडचा पहिलाच खेळाडू होय.
इशान बासरकर हा १७ वर्षांचा असून तो गत काही वर्षांपासून क्रिकेटच्या वेडापायी दररोज तासन्तास सराव करण्यासाठी मैदानावरच असतो. त्याने काही महिन्यापूर्वी हैदराबादला झालेल्या तेलंगणा प्रीमियर लिगक्रिकेट सामन्यातही दमदार कामगिरी केली होती. आता त्याला महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचा प्रतिनिधी म्हणून इंग्लंडमध्ये १९ जुलै ते ५ ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या कौंटी क्रिकेट स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे. तेथे एकूण १० सामने होणार आहेत.
या सामन्याच्या संघाची निवड नुकतीच झाली आहे. त्यात इशानचा समावेश करण्यात आला आहे. सध्या तो या स्पर्धेसाठी पुण्यात सराव शिबिरात सहभागी झाला आहे. त्याने गुजराती हायस्कूलमधून नुकतीच दहावी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्याने आपले करिअर क्रिकेटमध्येच करण्याचा निर्धार व्यक्त करीत त्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. कौंटी क्रिकेट सामन्यांसाठी अलिकडच्या काळात निवड झालेला तो नांदेडमधील पहिलाच खेळाडू ठरला आहे. त्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.