To live a reading culture, bring children closer to books, not mobile phones – Dr. Suresh Sawant नांदेड| पुस्तक वाचण्यातून माणूस समृद्ध होतो. ही वाचन संस्कृती आता जगण्यासाठी मुलांना मोबाईलच्या नावे तर पुस्तकांच्या सानिध्यात न्या असे आवाहन डॉ. सुरेश सावंत यांनी केले. पालक मोबाईलपासून दूर राहिले तर मुलेही मोबाईलपासून दूर होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मुलांच्या मानसिक समृद्धतेसाठी चांगल्या बाल साहित्याचीही गरज आहे. आता ही गरज साहित्यिकांनी पूर्ण करावी असेही ते म्हणाले.
नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघ, डिजिटल मीडिया परिषद आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या वतीने साहित्य अकादमी पुरस्काराचे मानकरी डॉ. सुरेश सावंत आणि महाराष्ट्र शासनाच्या वृत्त छायाचित्रकार पुरस्काराचे मानकरी सचिन मोहिते यांचा नांदेडमध्ये शुक्रवारी शासकीय विश्रामगृहात जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डी. पी. सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या सत्कार प्रसंगी डॉ. सुरेश सावंत हे बोलत होते. या कार्यक्रमास मराठी पत्रकार परिषदेचे राज्य उपाध्यक्ष प्रकाश कांबळे, नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष अध्यक्ष संतोष पांडागळे, विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष विजय जोशी, जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सरचिटणीस अनुराग पोवळे, डिजिटल मीडिया परिषदेचे जिल्हाध्यक्ष मुजीब शेख, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे जिल्हा समन्वयक रवींद्र संगनवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी डॉ. सावंत यांनी साहित्य आणि पत्रकारितेचा जवळचा संबंध असल्याचे सांगितले. मराठीला जेवढे थोर साहित्यिक लाभले आहेत त्यांचा पाया पत्रकारिताच असल्याचे ते म्हणाले. आचार्य अत्रे यांच्यापासून ही परंपरा सुरू आहे, असेही सावंत यांनी स्पष्ट केले. अध्यक्षीय समारोपात पालकमंत्री माजी पालकमंत्री डी. पी. सावंत यांनी साहित्य अकादमीचा पुरस्कार घोषित झालेले डॉ. सुरेश सावंत आणि महाराष्ट्र शासनाच्या वृत्त छायाचित्रकार पुरस्काराचा बहुमान मिळवलेले सचिन मोहिते यांच्यामुळे नांदेडची मान उंचावली असल्याचे स्पष्ट केले. डॉ. सुरेश सावंत यांची एकूण ५६ पुस्तक आहेत. त्यातील ३३ पुस्तके ही बालसाहित्यावर आहेत. त्यामुळे त्यांची बालसाहित्याप्रतीची ओढ स्पष्ट होते, असेही ते म्हणाले. सावंत यांनी यापुढेही अनेक पुस्तके लिहावेत ज्यातून समाजमन समृद्ध व्हावे, अशा सदिच्छाही त्यांनी व्यक्त केल्या.
या पुरस्काराला उत्तर देताना छायाचित्रकार सचिन मोहिते यांनी हा पुरस्कार माझा एकट्याचा नसून संपूर्ण नांदेडकरांचा गौरव असल्याचे सांगितले. अकरा वर्ष आपण या पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवले. शेवटी यश मिळाले त्याचा त्याचे समाधान असल्याचे ते म्हणाले. यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे राज्य उपाध्यक्ष प्रकाश कांबळे, अधिस्वीकृती समितीचे विभागीय अध्यक्ष विजय जोशी, ज्येष्ठ छायाचित्रकार विजय होकर्णे यांचेही समायोचित भाषणे झाली.
प्रास्ताविकात जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष पांडागळे यांनी कार्यक्रमामागची भूमिका विषद केली. नांदेड जिल्ह्याला अभिमानास्पद वाटावेत असे हे दोन्ही पुरस्कार आहेत. या दोन्ही पुरस्कारांच्या मानकऱ्यांचा सत्कार करणे हे नांदेडकरांचे कर्तव्य होते. त्यातून नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाने पुढाकार घेतला आणि हा सत्कार सोहळा आयोजित केला. हा सत्कार सोहळा प्रत्येक नांदेडकरांसाठी अभिमानास्पद असल्याचे पांडागळे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सरचिटणीस अनुराग पोवळे यांनी केले. आभार प्रदर्शन डिजिटल मीडिया परिषदेचे जिल्हाध्यक्ष मुजीब शेख यांनी केले. कार्यक्रमास जिल्हाभरातून आलेले पत्रकार, साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.