मुंबई। समाजातील प्रत्येक घटकाच्या विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. तृतीयपंथीयांसाठी शासन विविध योजना राबविते. या समुदायातील व्यक्तींनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे अवाहन शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत तृतीयपंथी व्यक्तींच्या कल्याणकारी योजनांबाबत राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन यशवंतराव चव्हाण सभागृह मुंबई येथे करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन मंत्री श्री.केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

या कार्यशाळेस सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, बार्टीचे महासंचालक सुनिल वारे, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये, किन्नरमां ट्रस्टच्या सलमा खान, युएनडीपी चे डॉ. चिरंजिवी भट्टाचार्य, तृतीयपंथीयांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मंत्री श्री. केसरकर म्हणाले की,  मानसिक बदल आणि संवादाच्या माध्यमातून तृतीयपंथीयांना समजून घेऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्व मिळून प्रयत्न करु या. तृतीयपंथीयांसाठी रोजगार निर्मिती करून सक्षमीकरणावर शासन भर देत आहे. या  समुदायासाठी वसतिगृह उभारण्याचा विचार सुरू असून इतर राज्यातील धोरणांचा अभ्यास करून या समुदायांसाठी राज्याचे सर्वंकष धोरण तयार करण्याचे काम सुरू आहे. या समुदायांचे जीवनमान उंचावेल यासाठी शासन नेहमीच प्रयत्नशील राहील. तृतीयपंथीयांच्या समस्या, प्रश्न व मागण्यांबाबत लवकरच मुख्यमंत्री महोदयांकडे बैठक घेण्यात येईल, असेही मंत्री श्री. केसरकर यांनी सांगितले.

या कार्यशाळेचे चार सत्रात आयोजन करण्यात आले होते. पहिल्या सत्रात तृतीयपंथीय व्यक्तींच्या सामाजिक समस्या, नोंदणी प्रमाणपत्र व ओळखपत्र याबाबत डॉ. वैशाली कोल्हे, सलमा खान, पवन यादव यांनी माहिती दिली. दुसऱ्या सत्रात सामाजिक व आर्थिक उन्नतीच्या योजना आणि शिक्षण व रोजगार याबाबत श्रीदेवी रासक यांनी माहिती दिली. तिसऱ्या सत्रात तृतीयपंथीय व्यक्तींचे आरोग्य, पुनर्वसन आणि कल्याणकारी योजना याबाबत डॉ. चिरंजिवी भट्टाचार्य यांनी माहिती दिली. चौथ्या सत्रात तृतीयपंथीय व्यक्तींचे मानसिक आरोग्य, तृतीयपंथीय व्यक्तींचे सामाजिक प्रश्न व त्यांचे मानवी हक्क अबाधित राखण्यासाठी सार्वजनिक धोरणाद्वारे निवारण याबाबत प्रा. श्याम मानव, निर्मला सामंत प्रभावळकर यांनी माहिती दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सामाजिक न्याय विभागाचे सचिव श्री. भांगे यांनी केले, तर आभार अवर सचिव रवींद्र गोरवे यांनी मानले. या कार्यक्रमास प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण, मुंबई वंदना कोचुरे, सहायक आयुक्त समाज कल्याण मुंबई शहर प्रसाद खैरनार, सहायक आयुक्त समाजकल्याण रायगड सुनील जाधव, सहायकआयुक्त समाजकल्याण ठाणे समाधान इंगळे उपस्थित होते.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version