नांदेड,अनिल मादसवार। गड-किल्ले जोपासने व त्यांची निगा राखणे ही आपली संस्कृती असून हा अमूल्य वारसा जोपासण्यावर भर देणे आवश्यक आहे. युवा पिढीने हा वारसा जतन करण्यासाठी सामाजिक जाणीवेतून सहभाग घ्यावा व या स्वच्छता मोहीमेला लोकचळवळीचे स्वरुप प्राप्त व्हावे, असे जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी आर. बी. गणवीर यांनी सांगितले.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या 350 व्या वर्षानिमित्त नंदगिरी किल्ला स्वच्छता मोहीमेच्या आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी सूरज गुरव, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सुर्यवंशी, नेहरू युवा केंद्राच्या चंदा रावळकर, उपप्राचार्य व्ही.डी. कंदेलवाड औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्रशिक्षणार्थी यांची उपस्थिती होती.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या माध्यमातून आज राज्यात गड-किल्ल्याची स्वच्छता करण्यात आली. त्याअनुषंगाने आज आयटीआय नांदेड यांच्या वतीने नांदेड येथील नंदगिरी किल्ल्याची व परिसराची स्वच्छता करण्यात आली. यात नांदेड आयटीआयच्या जवळपास 200 प्रशिक्षणार्थीनी सहभाग घेतला. यापुढेही अशा स्वच्छता मोहिम आयोजित करण्यावर भर देण्यात येईल असे जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी आर.बी.गणविर यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांनी यात घेतलेला उत्स्फूर्त सहभाग ही कौतुकास्पद बाब असल्याचे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सुर्यवंशी यांनी सांगितले. या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेवून स्वच्छता केली याबाबत आम्हाला अत्यंत आनंद झाला असून आत्मिक समाधान मिळाले असल्याचे पुनम केंद्र या विद्यार्थ्यानीने यावेळी सांगितले.