नांदेड। येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात सक्षम आरोग्यसेवेअभावी २४ तासांत २४ रुग्णांचा मृत्यु होण्याची घटना गंभीर आहे. त्याची चौकशी झालीच पाहिजे. मात्र, याच रुग्णालयात ७० रुग्ण गंभीर अवस्थेत असून, राज्य सरकारने युद्धपातळीवर निर्णय घेऊन त्या रुग्णांचे प्राण वाचवण्याची आवश्यकता आहे.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मी तातडीने सदर रुग्णालय गाठून प्रभारी अधिष्ठाता डॉ. शामराव वाकोडे व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांच्याकडून माहिती घेतली. या रुग्णालयातील परिस्थिती चिंताजनक आहे. राज्य सरकारने तातडीने दखल घेण्याची आणि विनाविलंब निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. येथील परिचारिकांच्या बदल्या झाल्या. मात्र, रिक्त झालेल्या पदांवर नवीन नेमणूक झाली नाही. डॉक्टरांची मोठ्या प्रमाणात कमतरता आहे.

डीपीडीसीतून मिळणाऱ्या निधीला तांत्रिक मान्यता न मिळाल्याने रूग्णालयासमोर आर्थिक संकट आहे. सीटीस्कॅन व इतर उपकरणांच्या देखभालीसाठी केलेल्या कराराचे पैसे दिले गेले नाहीत. त्यामुळे संबंधित सेवा पुरवठादाराना देखभाल थांबवली असून, येथील अनेक उपकरणे बंद पडली आहेत.

रुग्णालयाची क्षमता ५०० रूग्णांची असताना आज तिथे सुमारे १ हजार २०० रुग्ण दाखल आहेत.सदर रुग्णालयात दाखल ७० गंभीर रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक असेल तर खासगी डॉक्टरांची मदत घ्यावी, अशी सूचना मी प्रशासनाला केली आहे. जिल्हा शल्य चिकित्सकांनी तात्पुरत्या स्वरूपात जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार पाठविणार असल्याची माहिती दिली आहे.

येथील असुविधा व अडचणींबाबत माझे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयाशी आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याशी फोनवर चर्चा झाली. रुग्णालयाची आरोग्यसेवा सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने तातडीने निर्णय घ्यावेत, अशी मागणी मी त्यांना केली आहे.

ही वेळ राजकारण करण्याची नाही. त्यामुळे आज मी कोणत्याही निष्कर्षावर जाणार नाही. चौकशीअंती दोष कुणाचा हे स्पष्ट होईल. परंतु, राज्य सरकारने तातडीने रुग्णालयाची परिस्थिती न सुधारल्यास नागरिकांच्या असंतोषाचा स्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version