नांदेड। पोलिसांचा जागता पहारा आणि देशाच्या संरक्षणासाठी डोळ्यात तेल घालून केलेले संरक्षण यामुळे या देशाचा नागरिक सुरक्षित आहे. मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला हा भयानकच होता, मात्र हा हल्ला परतवून लावण्यासाठी पोलीस यंत्रणेने केलेले प्रयत्न कौतुकास्पद असल्याची भावना प्रभारी जिल्हाधिकारी पांडूरंग बोरगावकर यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रातील दिग्गज कलावंतांनी देशभक्तीपर रचना सादर करुन उपस्थितांत देशभक्तीची स्फुल्लिंगे रुजवली.

मुंबईवर २६/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या आठवणी जागवण्यासाठी व हल्ल्यातील शहीदांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी यावर्षी देखिल पत्रकार विजय जोशी यांची निर्मिती असलेला सैनिक हो तुमच्यासाठी…. या देशभक्तीपर गिताचा कार्यक्रम काल डॉ.शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी २६/११ च्या हल्ल्यातील शहीद झालेल्या वीर जवान, अधिकारी व नागरिकांना सभागृहाने श्रध्दांजली अर्पण केली.

यावेळी मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार, आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांची उपस्थिती होती. दि प्रज्वलन करुन जिल्हाधिकारी पांडूरंग बोरगावकर यांनी या कार्यक्रमाचे उद्घाटन केले. त्यानंतर बोलताना त्यांनी २६/११  च्या आठवणी जिवंत करताना पोलिसांच्या जिगरबाज वृत्तीचे कौतूक केले. पोलिसांच्या खड्या पहारामुळे आपला देश सुरक्षित आहे. २६/११ चा हल्ला परतवून लावण्यासाठी ज्या जिगरबाज पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांनी बाजी लावली याचे त्यांनी कौतुक केले.

यावेळी बोलताना अतिरिक्त पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांनी जाँबाज पोलिसांच्या कामगिरीचे कौतूक करताना हा हल्ला देशासाठी आव्हान होते. यात मृत्यूमुखी पडलेल्या व वीर मरण आलेल्या जवानांप्रती त्यांनी संवेदना व्यक्त केल्या. देशाच्या संरक्षणाची जबाबदारी पोलिसांची आहे, ते ती व्यवस्थित पार पाडीत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या उद्घाटकीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गझलकार बापू दासरी यांनी केले. यावर्षी महाराष्ट्रातील दिग्गज कलावंतांनी आपल्या देशभक्तीपर रचना सादर करुन रसिकांना मंत्रमुग्ध केले. प्रत्येक गाण्याला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संवाद बहुउद्देशीय सामाजिक सेवाभावी संस्था आणि नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  यावर्षीचा हा ५६ वा प्रयोग होता.

यावर्षी मराठवाड्यातील सुप्रसिध्द कलावंत इटीव्ही गौरव महाराष्ट्राचा व झी युवा संगीत संग्राम महाविजेता सुर नवा ध्यास नवा उपविजेता आणि मराठी चित्रपट डार्लींग आणि बॉईज-३ चा पार्श्वगायक रविंद्र खोमणे, सुर नवा ध्यास नवाचा पार्श्वगायक मुनव्वर अली (मुंबई), इंडियन आयडॉल मराठी फेम सुरभी गौड (मुंबई), लक्ष्मी खंडारे (मुंबई) सारेगम फेम, मानसी कुलकर्णी-देशपांडे (पुणे), वर्धिनी जोशी-हयातनगरकर (पुणे), विपुल जोशी  या दिग्गज गायकांनी देशभक्तीपर रचना सादर केल्या.

आरंभ है प्रचंड, सैनिक हो तुमच्यासाठी, शुर आम्ही वंदिले, प्रभो शिवाजी राजा, मायी तेरी चुनर, भारत हम को जान से प्यारा है, घर आजा परदेसी, ऐ वतन मेरे अबाद रहे तू, जिंदगी मौत, सुनो गौर से दुनियावालो, देश रंगीला, म्यानातून उसळे, शूर आम्ही सरदार, जयोस्तुते, यह देश है वीर जवानोंका, मिले सुर मेरा तुम्हारा या देशभक्तीपर रचना सर्व कलावंतांनी सादर करुन देशभक्तीची स्फुल्लिंगे उपस्थितांच्या मनामनात रुजवली. रविंद्र खोमणे, मुनव्वर अली या दोघांनी या कार्यक्रमावर चांगलीच छाप पाडून रसिकांच्या टाळ्या मिळविल्या. या कार्यक्रमाचे संगीत संयोजन सादसुरांची झी मराठी उत्सव नात्यांचा फेम वाद्यवृंद नाशिकचे अमोल पालेकर यांनी केले होते. ढोलकीवर नाशिकचे गंगा हिरेमठ, अ‍ॅक्टोपॅडवर सुशिल केदारे (मुंबई), की बोर्डवर जितेंद्र सोनवणे, (मुंबई), नईम भाई यांची संगीतसाथ होती. कार्यक्रमाचे निवेदन छत्रपती संभाजीनगर येथील आर.जे.अभय यांनी केले. 

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version