नांदेड, दत्ता शिराणे। येथील राजस्थानी एज्युकेशन सोसायटीच्या सहकार्याने व जयवकील फाउंडेशन, बीजे वाडिया हॉस्पिटल फॉर चिल्ड्रेन मुंबई, कमल उडवाडिया फाउंडेशन, एनएच-एसआरसीसी चिल्ड्रेन्स हॉस्पिटल मुंबई, अन्नम, एओसीएन इंडिया, यांच्या संयुक्त विद्यमाने गत १३ वर्षापासून मेंदूचे विकार असणाऱ्या मुला-मुलींसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येते. या शिबिराचा हजारो रुग्णांना फायदा झाला असून हे शिबीर या रुग्णांसाठी वरदान ठरत आहे.

या वर्षी शिबिराचे हे तेरावे वर्ष असून हे चोविसावे शिबीर गुरुवार दिनांक ५ ते ७ ऑक्टोबर या कालावधीत मगनपुरा, नवा मोंढा येथील आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालयात आयोजित करण्यात आले असून ह्या वर्षी मेंदूचे विकार सोबतच मणक्याचे विकार असणाऱ्या बालकांची तपासणी होणार आहे अशी माहिती राजस्थानी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ओमप्रकाश गिल्डा, उपाध्यक्ष कमल कोठारी, सचिव प्रकाश मालपाणी, सहसचिव डॉ. लक्ष्मीकांत बजाज, कोषाध्यक्ष जयप्रकाश काबरा, डॉ. अरुणकुमार तोष्णीवाल, अंकित अग्रवाल व शाळेचे मुख्याध्यापक नितिन निर्मल यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली आहे.

मणक्याच्या विकारावर केले जाणार उपचार

सद्यस्थितीत असंख्य बालकात मणक्याचे विकार आढळून येतात या विकारावर उपचार करण्यात येणार असल्याने यावेळी सदर शिबिरात प्रथमतः मणक्याचे विकार तज्ञ असलेले निष्णात डॉ. सिद्धार्थ शहा मणक्याच्या विकारावर उपचार व गरज पडल्यास शस्त्रक्रिया करणार असल्याची माहिती मुख्याध्यापक नितीन निर्मल यांनी यावेळी दिली. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश गिल्डा यांनी आत्तापर्यंतच्या आरोग्य शिबिरात किती रुग्णांवर उपचार, शस्त्रक्रिया करण्यात आली व किती रुग्णांना याचा लाभ झाला याची विस्तृत माहिती दिली.

आत्तापर्यंतच्या तेवीस आरोग्य शिबिरात हजारो रुग्णांवर उपचार करण्यात आले. याचा तब्बल ५ ते ६ हजारापेक्षा अधिक रुग्णांना लाभ झाला आहे. नेत्रशस्त्रक्रियेमुळे दृष्टिहीन असलेल्या रुग्णांना दृष्टी मिळाली तर हाडांच्या शस्त्रक्रियेनंतर उभे राहण्यास असमर्थ असणाऱ्या रुग्णांना आता चालता येऊ लागले आहे. अनेक रुग्णांचे चालताना तोल जाणे, फिट्स येणे व ऑटीझम अशा मेंदूशी संबंधित आजारातून आरोग्य शिबिरात घेतलेल्या सातत्याने उपचारामुळे काहींची सुटका झाली आहे तर बहुतेक रुग्ण सुटकेच्या मार्गावर आहेत. हे आरोग्य शिबीर मेंदूचे विकार असणाऱ्या मुला-मुलींसाठी वरदान ठरले आहे. या शिबिरात उपचार घेण्यासाठी महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटक व तेलंगाना येथील राज्यातूनही मोठ्या संख्येने रुग्ण येत आहेत.

नवीन रुग्णांसाठी पुर्व नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी नवीन रुग्णांनी आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालय, मगनपुरा नवा मोंढा नांदेड येथे प्रत्यक्ष जाऊन नोंदणी करावी तसेच शाळेत येणे शक्य नसणाऱ्या बाहेरगावच्या रुग्णांनी ८२०८११४८३२, ९०६७३७७५२० या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. प्रतीवर्षाच्या शिबिराप्रमाणे या वेळीही रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची गैरसोय होऊ नये यासाठी संस्था पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शन व मुख्याध्यापक नितीन निर्मल यांच्या नेतृत्वात आर. आर. मालपाणी मतिमंद व श्रीरामप्रताप मालपाणी मूकबधिर विद्यालयातील कर्मचारी जय्यत तयारी करीत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version