हिमायतनगर, अनिल मादसवार| तालुक्यातील मौजे कामारी परिसरात मंगळवारी झालेल्या पावसाने अंगणवाडी परिसरात तीन ते चार फूट पाणी साचून पहिल्याच पावसाने तळे निर्माण झाले आहे. त्यामुळे चिमुकल्या बालकांसह अंगणवाडीच्या कार्यकर्ती मदतनीस याना सुद्धा ये – जा करणे अवघड बनले आहे. साचलेल्या पाण्यामुळे साथीचे आजार निर्माण होऊन चिमुकल्या विद्यार्थ्यांचे आरोग्य धोकाय येण्याची भीत व्यक्त केली जात आहे. तात्काळ या साचणाऱ्या पाण्याचा बंदोबस्त करावा अन्यथा अंगणवाडीला कुलूप ठोकण्यात येईल असा इशाराही पालकांनी दिला आहे.
हिमायतनगर तालुक्यातील मौजे कामारी गावात हव्या त्या सुविधा उपलब्ध झाल्या नाहीत. त्यामुळे गावासाठी येणाऱ्या निधीचा उपयोग होतोय कश्यासाठी असा प्रश्न गावकर्यांना पडला आहे. गावातील रस्ते, नाल्या व इतर विकास कामे सरपंच ग्रामसेवक यांच्या अंतर्गत केली जात असताना अंगणवाडी परिसरात पाणी साचणार नाही याबाबत उपाययोजना का केल्या गेल्या नाहीत असा प्रश्न या निमित्ताने समोर आला आहे. अंगणवाडी शिक्षणाचा पाया असून, बालकांना अशिक्षणाची ओढ अंगणवाडीतून निर्माण होते. मात्र अंगणवाडीत शिक्षणासाठी बालकांना पाठविणे सध्या अवघड होऊ लागले आहे.
बुधवारी रात्री झालेल्या पहिल्याच पावसाने कामारी गावातील अंगणवाडी क्रमांक 1 व 3 या परिसरात अडीच ते तीन फूट पाणी साचले आहे. यामुळे एकाही विद्यार्थ्याला किंवा बालकालाच काय तर अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस यांना सुद्धा अंगणवाडीमध्ये ये जा करता येत नाही. क्रमांक एक व तीन अंगणवाडीमध्ये मिळून जवळपास 70 च्या वर विद्यार्थी संख्या आहे. वारंवार ग्रामपंचायत व संबंधित अंगणवाडी च्या वरिष्ठ प्रशासनाला कळवून सुद्धा त्यांनी याची दखल घेतलेली नाही.
त्यामुळे आज लहान लहान बालकांच्या जीवाशी खेळण्याचे काम ग्रामपंचायत व अंगणवाडी प्रशासन करत आहे. या साचलेल्या पाण्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, साचलेल्या पाण्यामुळे साथीचे आजार जडून विद्यार्थ्यांच्या जीवाचे काही बरे वाईट झाल्यास बालविकास विभागातील अधिकारी, सुपरवायजर व ग्रामपंचायत प्रशासन जबाबदार धरले जाईल. त्यासाठी तात्काळ उपाययोजना करून चिमुकल्यांच्या अंगणवाडीत साचलेल्या पाण्याचा तात्काळ बंदोबस्त करून पुन्हा पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी अन्यथा अंगणवाडीला कुलूप लावण्याचा इशाराही देण्यात आला आहे.