जिल्ह्यात जल जीवन मिशनची कामे गतिमान झाल्याने जिल्हा टँकरमुक्तीकडे

नांदेड| केंद्र शासन व राज्य शासनाच्या भागीदारांने संपूर्ण जिल्ह्यामध्ये मा. पंतप्रधान यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या जल जीवन मिशनच्या महत्त्वकांक्षी प्रकल्पाची अंमलबजावणी सद्यस्थितीत नांदेड जिल्ह्यात गतीने चालू आहे. त्यामुळे जिल्हा टँकर मुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे.
ग्रामीण जनतेला यापूर्वी 40 लिटर दरडोई दर मानसी पाणीपुरवठा करण्यात येत होता. आता या योजनेतून होणाऱ्या सर्व नळ पाणीपुरवठा योजना या 55 लिटर दरडोई दर मानसिक प्रमाणे आखण्यात आलेल्या आहेत. नांदेड जिल्ह्यात एकूण 1234 इतक्या नळ पाणीपुरवठा योजना जल जीवन मिशन कार्यक्रमांमधून घेण्यात आलेल्या आहेत. जवळपास 95% इतकी कामे वेगाने चालू झालेली आहेत. सदरील कामांना गती आल्याने किनवट व माहूर सारख्या डोंगरी भागातील नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी त्यांच्या दारापर्यंत पोहोचवण्यात असल्याने शंभर टक्के हंडामुक्ती झाल्याने महिला वर्गाकडून समाधान व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे नळ पाणीपुरवठा योजना राबवित असतांना शासनाच्या हर घर नल से जल किंवा हर घर जल या संकल्पनेनुसार नांदेड जिल्ह्याला असलेल्या एकूण 5 लाख 36 हजार 341 इतक्या नळ जोडणीच्या उद्दिष्टांपैकी आज रोजी 3 लाख 87 हजार 842 इतकी नळ जोडणी देण्यात आलेली आहे.
जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजना राबवताना व हर घर जल मिशन अंतर्गत नळ जोडणी करताना वेळोवेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा ग्रामीण विकास प्रकल्प यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, कार्यकारी अभियंता अमोल पाटील, जिल्हास्तरावरून नेमलेले 16 नोडेल अधिकारी, त्या-त्या तालुक्याचे गट विकास अधिकारी, संबंधित उप अभियंता, शाखा अभियंता यांच्याकडून वेळोवेळी कामास भेटी देण्यात येत आहेत. तसेच आवश्यक त्या ठिाकाणी सूचना देऊन कामे दर्जेदार गुणवत्तापूर्ण व गतीने पूर्ण करण्याच्यासाठी आवश्यक ते नियोजन केले जात असल्यामुळे ग्रामीण जनतेकडून समान व्यक्त होत आहे.
याव्यतिरिक्त वॅपकॉस ही केंद्रशासन नियुक्त संस्था, टाटा कन्सल्टन्सी ही केंद्र शासन नियुक्त संस्था, आयआयटी संस्था, दोन्हीही कंपनीचे सर्व अभियंते, जिल्हा परिषदेचे सर्व अभियंते या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमधून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उत्तम, गुणवत्तापूर्वक व दर्जेदार कामे करून जिल्हा प्रशासनाकडून यशस्वीपणे हाताळला जात असल्याने, नांदेड जिल्हा लवकरच टँकर मुक्तीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. शुध्द पेयजल पुरवठा होण्याच्या दृष्टीने वेळोवेळी पाण्याची रासायनिक व जैविक चाचणी केली जात आहे. त्यामुळे पाण्याच्या आजारातली मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे. एकूणच ग्रामीण भागातील महिलांच्या डोक्यावरील हांडे खाली उतरण्याचे महत्त्वाचे काम या जल जीवन मिशन अंतर्गत होणाऱ्या हर घर जल या कार्यक्रमामधून साध्य होत आहे. जिल्हा टँकरमुक्तीच्या दिशेने असल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, कार्यकारी अभियंता अमोल पाटील यांचे ग्रामीण जनतेतून कौतुक होत आहे. तसेच समाधान व्यक्त केल्या जात आहे.
