8 तारखेला नांदेड जिल्ह्यात जरांगे पाटील यांच्या चार ठिकाणी सभा
नांदेड| मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करून सरसकट कुणबी दाखले देण्यात यावेत या प्रमुख मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी हाती घेतलेलं आंदोलन राज्यभरात अधिक जोमाने चालु असताना, नांदेड सुद्धा यात मागे नसुन येत्या 8 डिसेंबर रोजी नांदेड जिल्ह्यात एकुण चार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 7 रोजी बारड येथिल सभा आटोपून रात्री मुक्कामाला नांदेड शहरात दाखल होणारे जरांगे पाटील हे दुसऱ्या दिवशी जिजाऊ नगर येथिल सभे पासुन आपल्या दिवसाची सुरुवात करत अनुक्रमे मारतळा, नायगाव, आणि कंधार येथिल सभेला संबोधित करणार आहेत. कंधार येथे नांदेड जिल्ह्यातला दुसरा मुक्काम करीत 9 डिसेंबर रोजी ते जांब जळकोट मार्गे लातुर जिल्ह्यात प्रवेश करणार असल्याची माहिती सकल मराठा समाज,नांदेडच्या वतीने आज पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे.
नांदेड जिल्ह्यातील 8 तारखेची पहिलीच सभा ही अतिशय भव्य अशी होणार असुन या सभेसाठी जिजाऊनगर वाडिपाटी येथे मातोश्री कॉलेज च्या पाठीमागील कल्हाळ येथिल तब्बल 111 एकर चे मैदान निवडले असुन सदरील मैदानावर नांदेड शहरासह ग्रामीण भागातील लाखों समाज बांधव या सभेला येणार असल्याचे नियोजन समिती कडून सांगण्यात आले आहे. या सभेचे नियोजन सुद्धा अतिशय शिस्तबद्ध चालु असुन जवळपास 19 कमिट्या नेमण्यात आल्या आहेत, वैद्यकीय कमिटी, अन्न वाटप कमिटी, पाणी वाटप कमिटी, पार्किंग व्यवस्थापन कमिटी, स्टेज व्यवस्थापन कमिटी, मराठा सेवक(स्वयंसेवक) कमिटी, प्रचार-प्रसार माध्यम कमिटी, कायदेशीर कागदपत्रे पुरवठा कमिटी यासह विविध कमिट्या बनवून आप आपल्या जबाबदाऱ्या वाटून देण्यात आल्या आहेत. या सर्व कमिटीच्या माध्यमातून सभेची जोरदार तयारी चालु असल्याचे सुद्धा सांगण्यात आले आहे. याच धर्तीवर मारतळा, नायगाव आणि कंधार चे सुद्धा नियोजन चालु आहे. या चारही सभेतील आयोजन समितीचे सदस्य यावेळी पत्रकार परिषदेस उपस्थित होते. प्रत्येक आयोजन समितीकडून आपापल्या भागातील गावा गावात या सभेच्या अनुषंगाने जोरदार वातावरण निर्मिती चालु आहे त्यामुळे प्रत्येक सभेला लाखोंचा जनसमुदाय उसळणार असल्याचे यावेळी सांगितले.
सभेच्या ठिकाणी विशेष लक्ष देत बाहेर गावातून येणाऱ्या समाज बांधवाची विशेष काळजी घेत भोजन, पाणी व मोबाईल टॉयलेट ची सुद्धा व्यवस्था करण्यात आली असुन,गाड्या पार्किंग करण्यासाठी वेगवेगळ्या जागी वेगवेगळ्या गावातून येणाऱ्या रस्त्यावर पार्किंगची सुविधा करण्यात आली असुन जिजाऊ नगर येथिल सभेसाठी जवळपास 6 पार्किंग करण्यात आल्या आहेत तर मारतळा येथे 4, नायगाव येथे 3 तर कंधार येथे 2 जागी मोठमोठ्या पार्किंग करण्यात आल्या असुन सभा संपल्यावर जाम होणार नाही याची सुद्धा काळजी घेण्यात आली आहे.
सभेच्या ठिकाणी वैद्यकीय समिती मार्फत ऍम्ब्युलन्स, डॉक्टर्स, नर्सेस तसेच प्रथमोपचार साठी मेडिसिन सुद्धा ठेवण्यात येणार असल्याचे नियोजन समिती कडून सांगण्यात आले. या चारही सभेत पोलीस प्रशासनाचा कडेकोट बंदोबस्त असला तरी नियोजन समितीच्या माध्यमातून हजारो मराठा सेवक आणि विशेष असे बॉडीगार्ड नेमण्यात आले आहेत त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने हे एक अतिशय महत्वाचे पाऊल उचलण्यात आले असुन कुठेही घाई गडबड होणार नाही याची दक्षता घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. स्टेज वरती छत्रपती शिवरायांच्या पुतळ्या शिवाय फक्त मनोज जरांगे पाटील हे एकटेच राहणार असुन कुणीही स्टेज वरती दिसणार नाही याची सुद्धा काटेकोर पणे काळजी घेण्यात आलेली आहे.
प्रत्येक सभेची सुरुवात ही जिजाऊ वंदनेने होऊन सांगता ही राष्ट्रगीतानेच होईल, प्रत्येक सभेच्या पुर्वी महाराष्ट्रातील नामवंत शाहीरांच्या माध्यमातून शाहिरी पोवाड्याचे गायन होणार असल्याने सभेसाठी जमलेल्या लाखों बांधवांचे खुप चांगल्या प्रकारे प्रबोधन होणार असुन जरांगे पाटील सभास्थळी पोहचायला थोडा वेळ लागला तरी पब्लिक जागेवरून हलणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे. सदरील सभेचे निधिसंकलन हे साखळी उपोषणास बसलेल्या आजूबाजूच्या गावा गावातून करण्यात आले असुन यात सर्व गावातील गोरगरीब समाज बांधवांचा फुल ना फुलाची पाकळी म्हणुन काही ना काही सहभाग असल्यामुळे सभेला कुठलाही निधी कमी पडणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.
जरांगे पाटील यांचा ताफा ज्या रस्त्याने जाणार आहे त्या रस्त्यावर जागोजागी भव्य स्वागत आणि अल्पोउपहार व पाण्याची व्यवस्था समाज बांधवाच्या वतीने करण्यात येणार असल्याची माहिती संयोजक समितीकडे प्राप्त झाली असुन या सर्व बाबींची सखोल चौकशी काल दि.२ डिसेंबर रोजी नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या सह अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्फत करण्यात आली असुन पोलीस प्रशासना मार्फत नियोजन कर्त्यांना योग्य त्या सुचना देण्यात आल्या आहेत. प्रशासकीय यंत्रनेच्या सूचनांचे योग्य ते पालन करीत या सर्वच विराट सभेचे काटेकोर नियोजन करण्यात नियोजन समित्या व्यस्त असल्याचे आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे. तसेच नांदेड जिल्ह्यातील तमाम मराठा समाजाला योग्य असेल त्या त्या ठिकाणी या विराट सभेला लाखोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे नम्र आवाहन सुद्धा सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.