नांदेड जिल्ह्यात तुळशी विवाहाला प्रारंभ; साहित्य खरेदीसाठी गर्दी
नांदेड| हिंदू धर्मामध्ये तुळशी विवाहाचे आयोजन करणे अत्यंत शुभ मानले जाते, याशिवाय तुळशी विवाहाचे आयोजन केल्याने कन्यादान सारखेच फल प्राप्त होते असा समाज आहे. त्याचा पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यात तुळशी विवाहाला दि. २३ पासून सुरुवात झाली असून, साहित्याची विविध दुकाने सजली आहेत. तुलसी विवाह लग्नाच्या साहित्य खरेदीसाठी लोकांची गर्दी उसळली आहे, लग्नाच्या साहित्यासह ऊस, फुले, आवळा यासह विविध पूजा साहित्य बाजारात उपलब्ध आहे.त्यामुळे, नांदेड जिल्ह्यात तुळशी विवाहाची तयारी जोरात सुरू आहे.
कार्तिक महिन्या भारतातील लोकांसाठी खूप महत्त्व आहे. असे म्हटले जाते की, या महिन्यात शुक्ल पक्षातील एकादशीला भगवान विष्णू चार महिन्यांच्या निद्रेनंतर जागे होतात, ते जागे होताच सर्व प्रकारची शुभ कार्ये सुरू होतात. यासोबतच हिंदू कॅलेंडरनुसार कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला तुळशी आणि शालिग्रामचा विवाह केला जातो. असे मानले जाते की तुळशीविवाह केल्याने कन्यादान सारखेच फळ मिळते आणि मोक्षाचे दरवाजे उघडतात. तुळशीचा विवाह योग्य रीतीने करणार्याला मोक्षप्राप्ती होते. त्यासाठी लागणारी साहित्याने बाजारपेठ फुलली असून, नागरिक ऊस, झंडूची फुले, आवळा, आवळाची फांदी, यासह इतर पूजेचे साहित्य खरेदीसाठी गर्दी करत आहेत. तूळशी आणि शालिग्रामची विधिवत पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि आयुष्यभर घरात सुख-समृद्धी नांदते. याशिवाय घरातील सदस्यांवर कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही असे पुराणात सांगितले जाते.
बहुतेक लोक कार्तिक महिन्याच्या द्वादशी तिथीला तुळशीविवाह करतात, त्यामुळे यावर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी २३ नोव्हेंबरला रात्री ९.०१ वाजता सुरू झाली असून, दि.२४ नोव्हेंबरला रात्री ७.०६ वाजता संपणार आहे. या दिवशी प्रदोष कालाची शुभ मुहूर्त संध्याकाळी ५:२५ ते ६:४५ पर्यंत आहे. त्यामुळे या शुभ मुहूर्तावरही लोक तुळशीमातेचा विवाह सोहळा करू शकतात असे पुरोहिताकडून सांगितले जात आहे.