नांदेड/हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर शहरासह ग्रामीण भागातील नवीन रत्स्याच्या कडेला वीज पोल उभारणीचे काम सुरु असून, या कामात अनियमितता दिसून येत असल्याने महावितरणच्या ठेकेदारावर कृपादृष्टी कोणाची..? असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते तथा भाजप युवा मोर्चा माजी तालुकाध्यक्ष रामभाऊ सूर्यवंशी यांनी उपस्थित करून या कामाबद्दल आक्षेप घेतला आहे. त्यामुळे तूर्तास तरी बांधकाम विभागाच्या हद्दीत होत असल्याने दुर्घटना झाल्यास महावितरण व ठेकेदार यास जबाबदार राहील..? असे पत्र बांधकाम विभागाने दिल्याने ठेकेदाराचा खोटारडेपणा उघड झाला आहे.
हिमायतनगर शहरापासून ते घारापुर पॉईंट आणि हिमायतनगर पासून पळसपूर भागाकडे होत असलेल्या राष्ट्रीय महामार्गालगत तसेच ग्रामीण भागात नवीन विजेचे खांब उभारण्याकामी ठेकेदारांकडून कामे सुरू आहेत. नवीन खांब बसविण्याचे काम सुरू असताना जमिनीमध्ये योग्य आकाराचा खड्डा खणून खांब उभा केल्यानंतर त्यामध्ये खांब उभा राहण्यासाठी सिमेंट काँक्रीटचा वापर करण्याऐवजी ग्रीटचा अधिकाधिक वापर करून सिमेंटचा खर्च कमी करण्याचा प्रकार होत आहे. रस्त्याला लागूनच बांधकाम विभागाची कोणतीही परवानगी न घेता खांब उभारणी केली जात असल्यामुळे भविष्यात भरधाव वेगातील वाहने खांबाला धडकून अपघात होण्याची शक्यता बळावली आहे. हिमायतनगर तालुक्यात असे प्रकार सर्रास घडून येत असल्याची चर्चा वेळोवेळी होत असून, रात्रीतून डीपी कोणताही शुल्क नं आकारता इतरत्र हलविणे यासह वीजतारा व खांब दुरुस्ती, जुने खांब काढून नवीन खांब उभे करणे, यासह दुरुस्तीच्या नावाखाली शासनाला गंडविले जात आहे. या सर्व प्रकारात येथे अनेक वर्षे नोकरी करत तहान मांडून बसलेल्या सहाय्यक अभियंत्याचेच नव्याने उभे होत असलेल्या पोलचे काम करणाऱ्या ठेकेदाराला अभय असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
या संदर्भात इन्फ्राचे श्री जगदाळे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी फोन उचलला नाही। तर हिमायतनगर ग्रामीणचे कनिष्ठ अभियंता कळसकर यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले की, बांधकाम विभागाने महावितरण विभागाला दिलेल्या पत्रानुसार ठेकेदाराला बांधकाम विभागाच्या हद्दीत होत असलेल्या कामामुळे दुर्घटना झाल्यास आपण जबाबदार असाल यासाठी परवानगी घेऊन नियमानुसार काम करा असे पत्र देऊन तात्पुरते काम थांबविले आहे वरिष्ठांचे मार्गदर्शन व सूचनेनंतर पुन्हा हे काम केले जाईल असे त्यांनी सांगितले.