श्रीक्षेत्र माहूर, इलियास बावानी| गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्थेचा भंग होऊ नये यासाठी माहूर पोलिसांनी गावठी दारू विक्रेत्यांविरुद्ध धडक कारवाई सुरू केली आहे. उत्सवाच्या काळात अवैध दारू विक्रीमुळे शांतता बिघडण्याची शक्यता लक्षात घेता, माहूर पोलिस निरीक्षक गणेश कराड यांनी विशेष मोहिम राबवत हिंगणी येथे दोन ठिकाणी छापे टाकले आणि मोठ्या प्रमाणावर गावठी दारू जप्त दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सण-उत्सवाच्या काळात अनेक वेळा मद्यधुंद व्यक्तींमुळे गैरप्रकार घडतात. त्यामुळे जनतेच्या सुरक्षेसाठी आणि उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी ही कारवाई आवश्यक ठरली आहे.गावठी दारू तयार करणाऱ्या अड्ड्यांवर छापेमारी मध्ये ७०० लिटर मोहफुल फसफसते रसायन जागीच पोलिसांनी नष्ट केला.पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी सांगितले की, “गणेशोत्सव हा श्रद्धेचा आणि भक्तीचा सण आहे. अशा सणाच्या काळात दारू विक्री आणि मद्यपानामुळे गोंधळ होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा अवैध प्रकारांना आळा घालण्यासाठी आम्ही कडक पावले उचलली आहेत.”
पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी सन उत्सवाच्या पार्श्वभूमीवर, गावठी दारूच्या विक्री किंवा साठ्याची कुठेही माहिती मिळाल्यास तात्काळ पोलीस ठाण्यात कळवावे. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या या कृतीचे स्वागत केले असून, यामुळे सणाच्या काळात शिस्त आणि सुरक्षिततेचं वातावरण निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.ही कार्यवाही पोलिस निरीक्षक गणेश कराड यांच्या मार्गदर्शनात पोउपनी अन्येबोईनवाड नापोका प्रकाश गेडाम साहेब,पो.का. पवन राऊत, दत्ता सोनटक्के, संघरत्न सोनसळे, होमगार्ड उमेश भगत, किशोर जाधव, प्रवीण जाधव यांनी केली.