अठराव्या लोकसभेसाठी शुक्रवारी दुस-या टप्प्यातील मतदान होत आहे. पहिल्या टप्प्यात विदर्भातील पाच मतदार संघात मतदान झाले. त्यात मतदारांनी विशेष उत्साह दाखविल्याचे दिसून आले नाही. मतदानाप्रती असलेला हा निरुत्साह झटकून मतदारांनी दुस-या टप्प्यात उत्साहाने मतदान करण्याची गरज आहे. मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. आपल्या मतदानातूनच देशाला कोणत्या दिशेने घेऊन जायचे आहे याचा निर्णय होणार आहे.

जगातली सर्वात मोठी लोकशाही आपल्या देशात नांदत आहे. ही आपल्या सर्वासाठीच अत्यंत स्वाभिमानाची बाब आहे. जवळपास दिडशे वर्षाच्या पारतंत्र्यानंतर देशाला स्वात्तंत्र मिळाले. त्यानंतर देशाने लोकशाही समाज व्यवस्था स्वीकारली. ती टिकवून ठेवण्याची जबाबदारी या देशातील नागरिकांची आहे. नागरिकांनी निवड केल्यानंतर सरकार सत्तेवर येते व त्यानंतर ते भलेबुरे काय असेल ते निर्णय घेते. पण नागरिकांनी मतदान केल्याशिवाय सरकार स्थापन होत नाही. गेली पंचाहत्तर वर्षे लोकशाही टिकवून ठेवण्यात आपण यशस्वी झालो. आता ती आणखी शतकानुशतके टिकवून रहावी याची जबाबदारी आपलीच आहे.

हा देश स्वतंत्र झाला तेव्हा या देशात लोकशाही टिकेल असे कोणालाच वाटले नाही. फाळणीच्या पार्श्वभूमीवर देश स्वतंत्र झाला. त्यावेळी या देशातील बहुसंख्य जनता निरक्षर होती. लोकशाही म्हणजे नेमके काय याचीही जाण बहुसंख्य लोकांना नव्हती. अशा बहुसंख्य निरक्षर लोकांच्या समाजात लोकशाही टिकेल का अशी शंका सर्वाच्याच मनात होती. देशाला स्वातंत्र देण्यापूर्वी इंग्लंडचे पंतप्रधान विन्सटन चर्चिल यांनी तीव्र विरोध केला. या लोकांना स्वातंत्र्य देऊ नका. लोकशाही कशाला म्हणतात ते या लोकांना माहिती नाही.

निसर्ग संपन्न, नदी, नाले, जंगल, खनिज संपतीने समृद्ध देशाचे वाटोळे होईल असे त्याने म्हटले होते. परंतु त्याचे म्हणणे खोटे ठरवत देशातील लोकांनी शिक्षित होत गेली पंचाहत्तर वर्षे लोकशाही टिकवून ठेवली. नुसती टिकवून ठेवली तर मतदान करताना वेगवेगळे प्रयोग करुन दाखविले. १९७१ साली पाकिस्तानचे दोन तुकडे करुन बांगला देशची निर्मिती करणा-या इंदिरा गांधींना लोकांनी डोक्यावर घेतले. त्याच इंदिरा गांधींनी १९७५ साली देशाला आणिबाणीच्या खाईत ढकलले तेव्हा लोकांनीच इंदिरा गांधींना मतदानाच्या माध्यमातून सत्तेच्या सोपानावरुन पायऊतार केले. अशी अनेक उदाहरणे देता येतील. ही आपल्या मताची करामत आहे.

आज देश एका वेगळ्या उंचीवर गेला आहे. लोकसंख्याही भरमसाठ वाढली आहे. एवढ्या विशालकाय देशाचे सत्ताधारी नेमणे म्हणजे सोपी गोष्ट नाही. त्यासाठी लोकांनी मतदानाच्या प्रति निरुत्साह दाखविणे योग्य नाही. गेल्या दहा वर्षात देशात दळवळणाच्या प्रांतात देशाने मोठी प्रगती केली.

केदारनाथ पासून कन्याकुमारी पर्यत रस्त्याचे जाळे निर्माण झाले. समृद्धी महामार्गासारखे अनेक प्रकल्प झाले, अजूनही सुरु आहेत. ते सगळे नितीन गडकरी यांच्यामुळे झाले. परंतु त्याच गडकरींच्या मतदार संघात अवघ्या ५३ टक्के लोकांनी मतदानात भाग घेतला. नागपूर देशाची उपराजधानी आहे. अशा ठिकाणी जर मतदानासाठी नागरिक बाहेर निघणार नसतील तर तो दोष गडकरींचा नाही. गडकरीसारख्या कर्तृत्ववान माणसाच्या पाठिशीही लोक उभे राहत नाहीत असा संदेश त्यातून जातो. त्यामुळे नेते निरुत्साही होतात. परिणामी चांगले लोक राजकारणात येण्यात धजावत नाही. हे लोकशाहीसाठी घातक आहे.

या देशाच्या संरक्षणासाठी जवान कडाक्याचे ऊन, हाडं गोठवणारी थंडी, मुसळधार पाऊस याची तमा न बाळगता सीमेवर दटून कर्तव्य बजावत असतात. आपण पाच वर्षातून एक दिवस मतदानासाठी काढू शकत नाही का याचा विचार करण्याची गरज आहे. आपले मतदान कोणालाही द्या परंतु मतदान करा. याचे कारण जगातील सर्वात मोठी लोकशाही नांदणा-या देशात निवडणुका कशा होतात याकडे सर्व जगाचे लक्ष आहे. त्यासाठी मतदानासाठी बाहेर निघून या देशातील लोकशाही मजबूत आहे हे जगाला दाखवून द्या.

लेखक …विनायक एकबोटे,ज्येष्ठ पत्रकार नांदेड, दि. 25.4.24, मो. नं. 7020385811

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version