हिमायतनगर,अनिल मादसवार। हिमायतनगर तालुक्यातून विदर्भातील ढाणकी, उमरखेड कडे जाणाऱ्या पळसपुर, डोलारी, शिरपली , शेलोडा, प्रधानमंत्री ग्रामसडक रस्त्याचे काम गेल्या तीन वर्षापासून अर्धवट असल्याने नागरिकांनी गुत्तेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये दहा दिवसात काम करा अन्यथा दिनांक १ मार्च पासून काम सुरू होईपर्यंत उपोषण करण्यात येईल असा इशारा एका निवेदनाद्वारे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्यासह, प्रशासकीय यंत्रणेला दिला आहे.
निवेदनामध्ये असे म्हटले आहे की, गेल्या तीन वर्षापासून हिमायतनगर पळसपुर डोलारी सिरपल्ली या प्रधानमंत्री ग्राम सडक रस्त्याचे काम संबंधित गुत्तेदार व अधिकारी करीत नसल्यामुळे या रस्त्यावरील पुलाचे सर्व काम अर्धवट अवस्थेत असून, या रस्त्यावरून येजा करणे अत्यंत अवघड व जीवघेणे झाले आहे. सदरील काम येणाऱ्या आठ ते दहा दिवसात सुरु न झाल्यास आम्ही पळसपुर, डोलारी ,सिरपली, येथील सर्व नागरिक गावकरी यांच्यासह सामूहिक साखळी उपोषणास बसणार असल्याचे म्हटले आहे.
अन्यथा २९ फेब्रुवारी २०२4 रोजी पर्यंत कामास सुरुवात न झाल्यास १ मार्च रोजी हिमायतनगर येथील नडवा पुलाजवळ साखळी उपोषणास बसणार आहोत. याची नोंद संबंधित प्रशासनाने घ्यावी असेही निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर तीन गावच्या ग्रामस्थांच्या विनंतीवरून डॉक्टर मनोज राऊत डोलारीकर , नागोराव शिंदे पळसपुरकर , गंगाधर गायकवाड दिघीकर , शेषराव वाघेकर ,साहेबराव कदम डोलारी ,बंडू उर्फ विठ्ठल आनंदराव पवार यांच्या सह्यानिशी आज हिमायतनगर तहसीलदार मार्फत कार्यकारी अभियंता व जिल्हाधिकारी यांना पाठवण्यात आले असल्याचे निवेदनात म्हटले आहे.