नांदेड| येथील चित्रकार व मुद्रणक्षेत्रातील उत्तम सजावट आणि मांडणीकार विजयकुमार चित्तरवाड यांना पुणे येथील अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेने पुरस्कार जाहीर केला आहे.
अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था, पुणेतर्फे देण्यात येणार्या राज्यस्तरीय विविध साहित्य पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली. सन २०२४ या वर्षातील बालसाहित्यातील नऊ विभागात पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. त्यापैकी उत्कृष्ट सजावटीचा सर्जेराव जगताप पुरस्कार विजयकुमार चित्तरवाड, यांना नांदेड येथीलच बालकवी माधव चुकेवाड यांनी लिहिलेल्या व इसाप प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ‘वाचू गाऊ नाचू आनंदे’ या पुस्तकाची उत्तम सजावट केल्याबद्दल जाहीर झाला आहे.
विजयकुमार चित्तरवाड यांनी मागील वीस वर्षांच्या काळात अनेक साहित्य संमेलनाच्या स्मरणिका, अनेक साहित्यिकांची पुस्तके, दीपावली विशेषांकांची मांडणी, सजावट केलेली आहे. अलीकडे त्यांनी चित्रकारितेच्या क्षेत्रातही आपला ठसा उमटविला आहे.
अ. भा. मराठी बालकुमार साहित्य संस्थेतर्फे दि. २ ऑगस्ट रोजी पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन लता मंगेशकर सभागृह, मॉर्डन महाविद्यालय, शिवाजीनगर पुणे येथे करण्यात आले आहे. ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख व संदर्भतज्ज्ञ, ग्रंथप्रसारक प्रसाद भडसावळे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. सन्मानपत्र, रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या यशाबद्दल विजयकुमार यांचे साहित्यक्षेत्रातून अभिनंदन होत आहे.