नांदेड। महाराष्ट्राच्या सामाजिक न्यायाला कर्तव्यतत्परतेच्या नव्या उंचीवर घेऊन जाणाऱ्या निर्णयाचा एका नवा आदर्श महाराष्ट्रात प्रथमच नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाने निर्माण केला आहे. “आम्हीही माणसं आहोत, आमचेही तसेच रक्त आहे, आम्हीही कुणाचे भाऊ-बहिण आहोत” अशी तृतीयपंथीयांची आर्त हाक ऐकुण जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आता त्यांना त्यांच्या हक्काच्या स्मशानभुमी व किन्नर भवनासाठी जागा वितरणाचे आदेश निर्गमीत केले. मागील अनेक वर्षांपासूनची मागणी लक्षात घेऊन दिवाळीच्या पर्वावर हा नवा सामाजिक न्यायाची अपूर्व भेट मिळाल्याबद्दल संपूर्ण तृतीयपंथीयांच्या संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले.

नांदेड येथील तृतीयपंथीयांनी सामाजिक न्याय विभागाकडे स्वताच्या हक्काची स्मशानभुमी व किन्नर भवन यासाठी जागा मिळावी अशी मागणी मागील काही वर्षांपासून लावू धरली होती. या मागणीचा प्राधान्याने विचार करून त्यांनाही मानवतेच्या प्रवाहात सामावून घेण्याच्या उद्देशाने सामाजिक न्याय विभागाने ही मागणी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या निदर्शनास आणून दिली. भारतीय राज्यघटनेने सर्वांना समान न्यायाची दिलेली हमी व त्यांचे घटनादत्त अधिकार सुरक्षित करण्याच्यादृष्टिने जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी विशेष लक्ष दिले होते.

राज्याचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाप्रमाणे जिल्ह्यातील सर्व तृतीयपंथीयांना मतदानकार्ड व स्वत:चे आधार यासह इतर कागदपत्रे देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. याच कर्तव्यतत्पर भूमिकेतून तृतीयपंथीयांना नांदेड शहरालगत मौ. म्हाळजा परिसरात 1.45 हे. आर. जमीनीबाबतचे आदेश जिल्हाधिकारी राऊत यांनी दिले. शासन निर्णयातील अटी व शर्तीनुसार नांदेड तहसिलदार यांना निर्देश देऊन या जमिनीचा आगाऊ ताबा सहायक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांना देण्याचे आदेशीत केले आहे. ही जमीन अतिक्रमण मुक्त, निर्विवाद आहे.

तृतीयपंथीयांच्या हक्काच्या जमीन वाटपात सर्वच घटकांच्या संवेदनेचा गौरव- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

प्रशासकीय पातळीवर अनेक संवेदनशील प्रश्नांना हाताळावे लागते. तृतीयपंथीयांचा विषय हा प्रशासनाच्यादृष्टिने तेवढाचा भावनिक व संवेदनशील असा होऊन जातो. अनेकदा त्यांच्याबाबत घेतलेले चांगले निर्णय काही प्रसंगी बदलावे लागतात. स्मशानभूमीसारखा अत्यंत महत्त्वाचा व तेवढाच गरजेचा असल्याने हा निर्णय व जागा देण्याचे आदेश पारीत करतांना न कळत एक आत्मिक समाधान लाभल्याच्या प्रतिक्रिया जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली.

हक्काच्या स्मशानभूमीत आता माणूस म्हणून विसावता येईल – किन्नर फरिदा शानूर बकश

जो जन्म वाट्याला आला त्याबद्दल कोणतीही तक्रार न करता आम्ही किन्नर, तृतीयपंथी जीवनातले सुख, दु:ख साजरे करतो. आमच्या हक्काची ही अनेक दिवसांपासूनची आमची मागणी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी पूर्ण करून आम्हाला दिवाळीची भेट दिली आहे. आता मृत्यूनंतर कुठे विलीन व्हायचे याची चिंता राहिली नसून हक्काच्या स्मशानभूमीत माणूस म्हणून विसावता येईल या शब्दात तृतीयपंथी किन्नर फरिदा शानूर बकश हिने शासनाप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, नांदेडचे उपविभागीय दंडाधिकारी विकास माने, नांदेडचे तहसीलदार संजय वारकड, तहसीलदार अवधाने, समाज कल्याण सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे, भूमी अभिलेख अधिकारी यांनी यासाठी प्रशासकीय पातळीवर तत्परतेने प्रक्रिया पूर्ण करून आपले कर्तव्य बजावले. किन्नरांच्या प्रश्नांबाबत येथील सेवाभावी संस्था कमल फाउंडेशन नांदेड यांनीही सामाजिक न्याय विभागाकडे समन्वय साधला होता.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version