नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांनी आज दि.१६ जुलै रोजी एक ऐतिहासिक पाऊल उचलत नासकॉम आणि स्किल फॅक्टरी लर्निंग प्रा. लि., पुणे यांच्यासोबत सामंजस्य करार (MoU) केला. उद्योग-शैक्षणिक सहकार्य अधिक बळकट करून कौशल्य विकासाला चालना देण्याच्या हेतूने झालेल्या या करारामुळे विद्यापीठाच्या सुमारे ४०० संलग्न महाविद्यालयांतील १.५ लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना थेट लाभ मिळणार आहे.
या सामंजस्य करारांतर्गत डिजिटल १०१ – ३० तासांचा (STEM व Non-STEM) अभ्यासक्रम, मोफत इंटर्नशिप व अपरेंटिसशिप संधी, उद्योग-आधारित प्रशिक्षण व प्लेसमेंटसाठी थेट संपर्क आणि आधुनिक नोकरी बाजारासाठी आवश्यक कौशल्य विकास या सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होणार आहेत.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांमध्ये प्रमुख उपस्थिती विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. डॉ. मनोहर चासकर, नासकॉमच्या सीईओ डॉ. अभिलाषा गौर, सुश्री शीबा थॉमस, स्किल फॅक्टरी लर्निंग प्रा. लि., पुणेचे अमोल बागल, कुलसचिव डॉ. डी. डी. पवार, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. प्रशांत पेशकर, नारायण चौधरी, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एम. के. पाटील, वित्त व लेखा अधिकारी डॉ. पराग भालचंद्र, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळाचे संचालक डॉ. शैलेश वाढेर, आयक्यूएसीचे संचालक डॉ. बी. सुरेंद्रनाथ रेड्डी, कौशल्य विकास केंद्राचे समन्वयक डॉ. एस. जी. गट्टाणी, संगणकशास्त्रे संकुलाचे संचालक डॉ. जी. व्ही. चौधरी आणि जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम यांची होती.
या कराराची वैशिष्ट्ये स्पष्ट करताना डॉ. एस. जी. गट्टाणी म्हणाले, “हा करार विद्यार्थ्यांना उद्योगाशी थेट जोडेल आणि त्यांच्या रोजगार क्षमतेत लक्षणीय वाढ घडवेल.” कुलगुरु डॉ. मनोहर चासकर यांनी स्पष्ट केलं की, “विद्यापीठाचे प्रमुख ध्येय विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करून त्यांना दर्जेदार नोकऱ्यांसाठी सज्ज करणे आहे. ही भागीदारी त्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल.” नासकॉमच्या प्रतिनिधी सुश्री शीबा थॉमस यांनी सांगितले की, “आम्ही स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठासाठी प्रकल्पाधारित इंटर्नशिप, सीएसआर उपक्रम व उद्योग-शैक्षणिक साखळी प्रबळ करण्यासाठी पाठिंबा देऊ.”
कार्यक्रमानंतर झालेल्या चर्चासत्रात अभ्यासक्रम व उद्योगाच्या गरजांमध्ये समन्वय साधण्यावर भर देण्यात आला. नासकॉमकडून लवकरच कॅम्पस प्लेसमेंटसाठी विविध कंपन्यांशी संपर्क साधण्याचे आश्वासन देण्यात आले. कार्यक्रमाची सांगता डॉ. बी. सुरेंद्रनाथ रेड्डी यांनी आभार प्रदर्शनाने केली. ते म्हणाले, “हा करार स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी नव्या संधी निर्माण करणारा आणि उद्योगांसाठी प्रशिक्षित मनुष्यबळ घडवणारा आहे.”
हा करार स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने उद्योग-शिक्षण साखळी बळकट करण्यासाठी उचललेले एक सकारात्मक व भविष्यदृष्टीपूर्ण पाऊल आहे. यामुळे विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील कौशल्य प्रशिक्षण आणि थेट उद्योग संपर्क मिळेल, तसेच बदलत्या नोकरी बाजारासाठी आवश्यक कौशल्यांनी ते सज्ज होतील.