हदगाव, शेख चांदपाशा| तालुक्यातील पीएम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिरड येथे शनिवार दिनांक 5 एप्रिल रोजी भव्य योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात विद्यार्थ्यांसह शिक्षक व पालकांचा मोठा सहभाग लाभला. शिबिरात प्रसिद्ध साहित्यिक डॉ. राम वाघमारे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लक्ष्मण चंपतराव पाटील कल्याणकर होते. प्रमुख अतिथी म्हणून ड्रीम फिटनेस स्टुडिओच्या योग संचालिका रेणुका गुप्ता, गटशिक्षणाधिकारी किशनराव फोले, बालासाहेब ब्यक्ती डोके यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना डॉ. वाघमारे म्हणाले, विद्यार्थ्यांनी मेहनत, कष्ट व सातत्यपूर्ण अभ्यासामुळे सहज यश मिळवते. आई-वडिलांचा सन्मान राखणे ही आपल्या संस्कृतीची मूलभूत शिकवण आहे. विद्यार्थ्यांनी महापुरुषांचे चरित्र वाचून त्यातून प्रेरणा घेतली पाहिजे. वाचन व लेखनाच्या माध्यमातून आपले व्यक्तिमत्व घडवून देशाच्या प्रगतीसाठी योगदान द्यावे. मोबाईलपासून दूर राहून पुस्तकांशी मैत्री करणे हेच खरे यशाचे रहस्य आहे. गाणे, नृत्य, चित्रकला यांसारख्या कलांमध्ये रुची असलेल्या विद्यार्थ्यांनी त्या क्षेत्रात प्रगती साधावी, असेही डॉ. राम वाघमारे म्हणाले.
गटशिक्षणाधिकारी किशनराव फोले यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना योगाचे महत्त्व विषद केले. योगा हा फक्त शारीरिकच नव्हे तर मानसिक आरोग्यासाठीही अत्यंत आवश्यक आहे. नियमित योग साधनेमुळे एकाग्रता वाढते व तणाव दूर होतो, असे ते म्हणाले. यावेळी योग टिचर रेणुका गुप्ता यांनी योगाचे शास्त्रीय महत्त्व स्पष्ट करत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष योग प्रात्यक्षिके दाखवून मार्गदर्शन केले. त्यांनी योगासनांचा दैनंदिन जीवनातील उपयोग कसा करावा याविषयी सखोल माहिती दिली.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन शिक्षण विस्तार अधिकारी शिवाजीराव शिंदे व संभाजी फाळके यांच्या पुढाकाराने करण्यात आले. प्रारंभी मान्यवरांचा शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने शाल व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात शालेय विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी सहभाग घेऊन योगाचे धडे घेतले. शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व मान्यवरांनी आयोजकांचे व मार्गदर्शकांचे विशेष कौतुक केले.