नांदेड| जागतिक Accreditation दिवसाचे औचित्य साधून आज नांदेड येथील जिल्हा पाणी तपासणी प्रयोगशाळेत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. भुजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेमार्फत आयोजित या कार्यक्रमात प्रयोगशाळा सर्वसामान्य नागरिक व जिल्हा परिषदेतील कर्मचारी वर्गासाठी खुली ठेवण्यात आली होती.
या कार्यक्रमात उपस्थितांना प्रयोगशाळेतील विविध तपासणी प्रक्रियेची प्रत्यक्ष माहिती देण्यात आली. पाण्यातील रासायनिक व जैविक घटकांची तपासणी, NABL Accreditation प्रक्रिया, उपकरणांचे प्रात्यक्षिक तसेच पाणी गुणवत्ता सनियंत्रण प्रणाली अंतर्गत नमुन्यांच्या नोंदणीपासून निकाल मिळेपर्यंतची संपूर्ण साखळी समजावून सांगण्यात आली. याशिवाय, काही निवडक पाण्याचे नमुने तपासून उपस्थितांना प्रत्यक्ष प्रयोगशाळेचा अनुभव देण्यात आला.
जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक नारायण मिसाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल रावसाहेब, भुजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉ. बी.एन. संगनवार यांच्या मार्गदर्शनात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमातून नागरिकांमध्ये प्रयोगशाळेच्या कार्यपद्धतीबाबत जागरूकता वाढली असून, गुणवत्तापूर्ण पाणी तपासणी सेवा विषयी विश्वास अधिक दृढ झाला आहे.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संगीता पोपलायकर, सचिन अन्नदाते, गोविंद अन्नदाते, मोहम्मद साबीर शेख आदींनी विशेष परिश्रम घेतले. या प्रसंगी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक मिलिंद व्यवहारे, जिल्हा पाणी गुणवत्ता सल्लागार केपेंद्र देसाई, आरोग्य विस्तार अधिकारी एस. पी. गोखले, महेश मुखेडकर, पंडितराव फटींग, आर. एस. गावंडे, मुनीर अली, शेख शादुल, शेख बाबुमिया यांची उपस्थिती होती. जिल्ह्यातील सर्व सहा उपविभागीय प्रयोगशाळांमध्येही जागतिक Accreditation दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.