नांदेड। मुखेड येथील एका पत्रकारावर प्रशासनाकडून तडकफडकी गुन्हा दाखल करण्यात आल्याच्या घटनेनंतर खुलासा देण्याची संधी दिल्या शिवाय व MCMC कक्षाला कळवल्या शिवाय अशी थेट कुठलीही कारवाई करू नये अशा सूचना मी अधिकाऱ्यांना दिल्याचे आज जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सांगितले.डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या एका कार्यक्रमात जिल्हाधिकाऱ्यांची भेट झाली.यावेळी उपस्थित जिल्हा पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुखेडच्या घटनेबाबत आपली बाजू मांडली.तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत कालच मी अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्याचे सांगितले.
आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी काटेकोरपणे व्हावी हे अपेक्षित असले तरी निवडणूक आयोगाची बदनामी केली असा शोध लावून मुखेड तालुक्यात एका पत्रकारविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई तालुका स्तरावर परस्पर करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी स्तरावर कुठलीच माहिती नव्हती अशी माहिती यातून समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली. यावेळी पत्रकारांवर अशा पद्धतीने परस्पर गुन्हे दाखल करण्यात येऊ नयेत अशी विनंती जिल्हा पत्रकार संघाने त्यांना केली.
त्याबाबत अधिनस्त अधिकाऱ्यांनी ही बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देणे आवश्यक असून तसे आदेश आपण काल झालेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले असल्याचे स्पष्ट केले.यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गोवर्धन बियाणी, पञकार हल्ला विरोधी कृती समितीचे जिल्हा समन्वयक रविंद्र संगनवार, महानगर समन्वयक प्रशांत गवळे, किरण कुलकर्णी,लोकशाही वृत्त वाहिनीचे कमलाकर बिरादार, आज तक चे कुवरचंद मंडले, साम मराठीचे संजय सुर्यवंशी, श्रीराम मोटर्गे आदी पत्रकार उपस्थित होते.