
उत्तर प्रदेशातील वाराणसीमधील सिरगोवर्धनपूर या गंगा नदीच्या तीरावरील छोट्याशा गावात गुरु रविदास यांचा जन्म रविवार दि. १५ फेब्रुवारी १३९८ रोजी झाला. ही एक इंग्रजी तारीख संशोधनानंतर निश्चित करण्यात आली आहे पण कांही अडेलतट्टू लोकं ती मानण्यास अजूनही तयार नाहित. या बाबतीत आम्हाला आमचे वर्तन निश्चित करावे लागणार आहे. समाजात एकवाक्यतेसाठी जो सर्वमान्य आहे तो तोडगा मान्य करावाच लागणार आहे. तिथे उगीच प्रत्येकांनी आपली अक्कल पाजळत बसण्याची आवश्यकता नाही.
छ. शिवाजी महाराज यांची जयंती कांही काळ १६ एप्रिल म्हणून साजरी करण्यात आली. त्यानंतर ८ फेब्रुवारी म्हणण्यात आली. नंतर शासनाच्या वतीने संशोधन समिती स्थापन करण्यात आली. त्यानुसार १९ फेब्रुवारी ही तारीख निश्चित करण्यात आली. त्यादिवशी महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक सुट्टी जाहिर केली. आता ही तारीख कुणी बदलू शकणार नाही. शासनाच्या या समितीत कालनिर्णयकार जयंत साळगावकर हे होते. समितीत राहूनही त्यांनी थोडी गद्दारी केली. ही इंग्रजी तारीख आपणाला मान्य नाही, शिवजयंती तिथीप्रमाणेच साजरी करावी असा आग्रह त्यांनी धरला होता. तशा जाहिराती त्यांनी तत्कालीन वृत्तपत्रांना दिल्या होत्या. त्यांचा हा विचार तत्कालिन कट्टर शिवसेनेने उचलून धरला होता.
शिवसेनेची सत्ता असतांना पूर्वीचा शासनादेश डावलून शासकीय स्तरावर तिथीप्रमाणेच शिवजयंती साजरी करण्यात आली पण आता शिवसेनेच्या पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. शिवसेना दुभंगली. त्यात कट्टरता संपून मवाळता आली. त्यामुळे आज तरी शिवजयंती इंग्रजी तारखेप्रमाणेच साजरी करण्यात येत आहे. परिवर्तनाला वेळ लागत असतो. लोक आपला वाढदिवस इंग्रजी तारखेला साजरा करतात आणि महामानवांच्या जयंती बाबतीत उगीच तिथीला कवटाळून बसत असतात.
महात्मा जोतीराव फुले यांच्या जन्म तारखेच्या बाबतीतही कांही सनातन्यांनी असाच घोळ घालण्याचा प्रयत्न केला. त्यासाठीही शासनाने समिती निश्चित केली होती. त्यानुसार ११ एप्रिल ही तारीख निश्चित करण्यात आली. अशी एखादी समिती गुरु रविदासांच्या बाबतीत निश्चित झाली तर बरे होईल पण नामांकित चर्मकार नेते अजूनही टपरी आणि लिडकाॅममध्येच अडकून पडले आहेत. कारण त्यांनीच अजून रविदास नीट वाचला नाही किंवा समजून घेतला नाही असे जाणीवपूर्वक खेदाने नमूद करावे लागत आहे. आजही चर्मकार नेते रविदास ऐवजी रोहिदास म्हणण्यातच धन्यता मानत असतात. याबाबत कांही राष्ट्रीय नेत्यांबाबत माझा वादही झाला आहे.
गुरु रविदास जयंतीची तारीख निश्चित करणे ही खरे तर उत्तर प्रदेश सरकारची जबाबदारी आहे पण तेथील सरकार पळी पंचपात्राचे सनातनी सरकार असल्याने ते याबाबतीत संशोधन समिती स्थापन करतील असे वाटत नाही. वाराणसी येथील गुरु रविदास जन्मभूमीतही माघ पौर्णीमेचे समर्थक आहेत. नव्याने स्थापन झालेल्या रविदासीया धर्म संघटनेने देखिल परिवर्तनवादी भूमिका न घेता सनातनवादाचे समर्थन चालविले आहे. हरि हे सिंबाॅल घेऊन गुरु रविदासांना त्यांनी हरी भक्त परायण दाखविण्याचा खटाटोप चालविला आहे.
अशा प्रकारे आपले एकंदरीत वर्तन परिवर्तन विरोधी असल्याने गुरु रविदासांचे एक नाव, एक जन्म तारीख, एक मृत्यू तारीख, एक चित्र, एक चरित्र, एक विचार निश्चित होऊ शकत नाही. यास जबाबदार कोण ? आम्ही एकवाक्यता निर्माण केली पाहिजे. आमचे सामुहिक वर्तन बदलले पाहिजे. माघ पौर्णिमा निश्चित तारखेला येत नाही. ही तिथीची तारीख मागे पुढे होत असते. एक निश्चित इंग्रजी तारीख स्वीकारली तर समाजात निश्चितता येऊ शकते.
यासाठी एक मोठा आधार डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आहे. त्यांनी वैज्ञानिक पद्धतीने पहिली गुरु रविदास जयंती दि. १५ फेब्रुवारी १९५३ रोजी दिल्ली येथे साजरी केली. ही ५५५ वी जयंती होती. त्यानुसार १५ फेब्रुवारी १३९८ ही गुरु रविदास जयंतीची तारीख ठरते. हे वाचन केल्यावर कळेल. वाचन न करता नुसता वाद घालायची आम्हाला सवय झाली आहे. आमचे नाही तर नाही पण डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे तरी ऐकावे. यासाठी समाजाचे प्रबोधन झाले पाहिजे पण प्रबोधनाला विरोध करण्यात येतो. गुरु रविदास जयंती म्हणजे भजन, किर्तन, भंडारा आणि मिरवणूक यातच अडकून पडली आहे. प्रबोधनाचे कार्यक्रम होतात पण त्याचे प्रमाण कमी आहे, ते वाढले पाहिजे यासाठी आपण आपले वर्तन परिवर्तनवादी केले पाहिजे !
– इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर, अध्यक्ष, अ. भा. गुरु रविदास समता परिषद, मो. ८५५ ४९९ ५३ २०
