नांदेड। भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित खासदार डॉ. अजित गोपछडे हे आज दि. 23 रोजी सकाळी 9 वाजता देवगिरी एक्स्प्रेसने नांदेड येथे येणार आहेत. खासदार झाल्यानंतर ते प्रथमच नांदेडमध्ये येत असल्याने शहरातील रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तख्त सचखंड श्री हजुर साहिब गुरूद्वारा दर्शन, महात्मा ज्योतिबा फुले, महात्मा बसवेश्वर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, महाराणा प्रतापसिंह यासह शहरातील विविध महापुरूषांच्या पुतळ्यास अभिवादन ते करणार आहेत.
भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते डॉ. अजित गोपछडे यांना राज्यसभेवर पक्षाकडून संधी देण्यात आली. राज्यसभेवर निवडून आल्यानंतर डॉ. अजित गोपछडे हे शुक्रवार, दि. 23 फेब्रुवारी सकाळी 9 वाजता देवगिरी एक्स्प्रेसने नांदेड येथे येणार आहेत. त्यानंतर 9 ते 9.30 शासकीय विश्रामगृह येथे राखीव वेळ आहे. 9.30 ते 12 या वेळेत नांदेड शहरातील विविध महापुरूषांच्या पुतळ्यास ते अभिवादन करणार आहेत. त्यानंतर नांदेडहून नरसीकडे रवाना होतील.
नरसी येथून परमपूज्य डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचे जन्मगाव कंदकुर्ती भव्य रॅलीने ते प्रस्थान करतील. कंदकुर्ती येथे डॉ. हेडगेवार यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन व श्रीराम मंदिरात महाआरती करून कोल्हे बोरगावकडे रवाना होतील. दुपारी 3.30 वाजता त्यांचे जन्मगाव कोल्हे बोरगाव ता. बिलोली येथे आगमन व सायंकाळी 5 वाजता भव्य ागरी सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सत्कार करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कोल्हे बोरगाव येथे उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले.