हिमायतनगर – हदगाव तालुक्यातील नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी
हिमायतनगर,अनिल मादसवार| शहर व तालुका परिसरात रविवारी झालेल्या वादळी वारे व गारपिटीमुळे शेतीतील गहू, हरभरा, फळबाग यासह अन्य पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. निसर्गाच्या प्रकोपामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी राजा पुन्हा आर्थिक संकटात सापडला आहे. हि बाब लक्षात घेता तात्काळ हिमायतनगर – हदगाव तालुक्यातील नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी अशी मागणी हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांची भेट घेऊन केली आहे. त्यामुळे गारपिटीने नुकन्सीत आलेल्या शेतकऱ्यांना मदत मिळण्याची अशा लागली आहे.
यंदा खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे सोयाबीन व कापसाच्या उतपादन घट झाली, या संकटातून बाहेर निघण्यासाठी शेतकऱ्यांची रब्बीवर भिस्त होती. ती अशा पल्लवित झाली असताना अचानक वादळी वारे आणि विजांचा गडगडाट होऊन मागील महिन्याभरापूर्वी पिके नुकसानीत आली. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी हरभऱ्यावर नांगर फिरवून दुसरी पिके दुसऱ्यांदा हरभरा व गव्हाची पिके घेतली. तो गहू – हरभरा पोटऱ्यात आला असताना तर काही शेतकऱ्यांनी कापणी करून ठेवलेली असताना अचानक रविवारी वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतात हातातोंडाशी आलेली पिके गारपिटीने नुकसानीत आली. अनेक शेतकऱ्यांनी कापून ठेवलेले हरभर भिजून गेला.
दरम्यान झालेल्या गारपिटीच्या नुकसानीने हिमायतनगर व हदगाव तालुक्यातील हजारो हेक्टर मधील रब्बी पिकाचे नुकसान झाले असल्याचा अंदाज माहूसाल अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे. त्यामुळे सोमवारी महसूलचे अधिकारी आणि हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. तसेच याबाबत जिल्हाधिकारी अभिजित राऊत याना माहिती दिली. तसेच आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी थेट मुंबई गाठून कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांची भेट घेतली. आणि निसर्गाच्या कोपामुळे हिमायतनगर तालुक्यात झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील हरभरा, गहू, करडई, तूर, फळबागांमध्ये टरबूज, संत्रा, केळी, मोसंबी, ड्रॅगंन फ्रुट, आंब्यासह शेती पिकांचं मोठं नुकसान झाले असल्याचे सांगून तात्काळ या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत मिळून द्यावी अशी मागणी केली आहे.