इंडिया मेगा ऍग्रो कंपनी विरोधात शेतकरी सामूहिक जलसमाधी घेणार
नांदेड। कुष्णूर एमआयडीसी येथील इंडिया मेगा ऍग्रो अनाज कंपनीचे संचालक यांना तात्काळ अटक करावी व शेतकऱ्याचे हक्काची रक्कम देण्यात यावी अन्यथा अन्यायग्रस्त शेतकरी नांदेड येथील गोदावरी नदी पात्रामध्ये सामूहिक जलसमाधी घेणार असा इशारा रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर यांनी आज मुंबई येथे मंत्रालयामध्ये उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणीस यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
पांडुरंग शिंदे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, कुष्णूर एमआयडीसी येथील इंडिया मेगा ऍग्रो अनाज कंपनीने 1200 शेतकऱ्याचा शेतमाल (हरभरा सोयाबीन, हळद इ ) सन 2020- 21 या काळात खरेदी केला होता. या शेतकऱ्याचे 21 कोटी रुपये कंपनी देणे बाकी आहे.
शेतकऱ्यांनी आपल्या हक्काच्या रक्कमेसाठी अनेकदा कंपनीच्या विरोधात विविध प्रकारे आंदोलने केली. दि.१४/०८/२३ रोजी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय समोर सामूहिक आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता. या आंदोलनाची दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक नांदेड यांच्या आदेशानुसार कुंटूर पोलीस स्टेशन येथे दि.१८/०९/२३ रोजी कंपनीचे संचालक अजय कुमार बाहेती ,अविनाश काबरा व नागोराव बांद्रे यांच्या विरोधात कलम ४२०,४०६, ४०९,५०६,३४ नुसार गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल होऊन तब्बल ४ महिने झाले आहेत. शेतकऱ्याला फसवणाऱ्या गुन्हेगाराला अटक झाली नाही, तो उधळ माथ्याने समाजामध्ये व वेगवेगळ्या शहरांमध्ये मोजमजा करत फिरत आहे. दुसरीकडे अन्यायग्रस्त शेतकरी व कुटुंब तणावाखाली जीवन जगत आहेत.
शेतकऱ्यांना फसवणाऱ्या कंपनीच्या संचालकाला तात्काळ अटक करावी व सर्व शेतकऱ्यांचे पैसे देण्यात यावे ,अशी आम्ही आपणास विनंती करत आहोत, अन्यथा रयत क्रांती संघटना सर्व शेतकऱ्याला घेऊन नांदेडच्या गोदावरी पात्रामध्ये सामूहिक जल समाधी घेणार याची दखल प्रशासनाने घ्यावी. या निवेदनाची प्रत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, गृहराज्यमंत्री यांना सुद्धा देण्यात आली.