केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनेत किनवट तालुक्याला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न – मिनल करनवाल
नांदेड| केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनेत किनवट तालुक्याला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मिनल करनवाल यांनी केले.
गुरुवार दिनांक 19 ऑक्टोबर रोजी आकांक्षी तालुका कार्यक्रमांतर्गत किनवट पंचायत समितीमध्ये घेण्यात आलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संतोष तुबाकले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ, नरेगाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमित राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आवलवार, जिल्हा कृषी अधिकारी बेतीवार, किनवट पंचायत समितीचे गट विकास अधिकारी वैष्णवसह आदींची यावेळी उपस्थिती होती.
पुढे त्या म्हणाल्या, लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी आकांक्षित कार्यक्रम राबवला जात आहे. या अंतर्गत किनवट तालुक्यातील सर्व गावात मूलभूत पायाभूत सुविधेसह शेती, जलसंपत्ती, आर्थिक समावेशन, रोजगार, शिक्षण, कौशल्य विकास आदी योजना राबवल्या जाणार आहेत. आरोग्य विभागाच्या आयुष्मान भारत अंतर्गत तालुक्यातील सर्व नागरिकांची शंभर टक्के नोंदणी केली जाणार असल्याचेही सीईओ मिनल करनवाल यांनी सांगितले. यावेळी नागरिकांच्या विविध तक्रारी स्वीकारून त्यांच्या तक्रारीचे समाधान त्यांनी केले. काही तक्रारी संबंधित विभागांना सोपविण्यात आल्या आहेत. यावेळी जिल्हा परिषदेचे खाते प्रमुख, पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती.
बोधडी येथील अंध विद्यालय व अंगणवाडीला भेट
किनवट तालुका दौऱ्यात असताना मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी बोधडी येथील अंध विद्यालयास भेट दिली. तेथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला तसेच येथील अंगणवाडीमध्ये सकस अमृत आहार योजने अंतर्गत लाभार्थ्यांची भेट घेऊन संवाद साधत मार्गदर्शन केले. गरोदर मातांनी सकस आहार घेणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी किनवट व माहूर तालुक्यात अमृत आहार योजना राबवली जात असल्याचे सांगितले.
घरकुल व जल जिवन मिशनच्या कामाची पाहणी
किनवट तालुक्यातील मांडवा येथे सुरू असलेल्या घरकुल बांधकाम योजना आणि जल जीवन मिशन अंतर्गत नळ जोडणी व ईतर कामांची पाहणी मुख्य कार्यकारी अधिकारी करनवाल यांनी केली. येथील जिल्हा परिषद शाळेलाही भेट देऊन शिक्षक व विद्यार्थ्यांची हितगुज केली.