हिमायतनगर, अनिल मादसवार| शहरातील शिवनेरी प्रतिष्ठानच्या ओम बाल गोपाळ गणेश मंडळाच्या सदस्यांनी आगळावेगळा उपक्रम हाती घेतला आहे. श्री विसर्जन मिरवणुकीत कोणताही गाजा-वाजा न करता आणि इतर अनावश्यक खर्च टाळून शहरातील जि.प्र.प्रा.कन्या शाळेतील एक वर्ग खोली रंग रंगोटी करून पूर्ण खोलीला पुठी मारून डिजिटल करण्याचा संकल्प करून कामाला सुरुवात केली आहे. गणेश मंडळातील सदस्यांनी घेतलेल्या या आदर्श उपक्रमाचा सर्व स्तरातून कौतुक केल जात आहे.
हिमायतनगर शहर व परिसरात एककीकडे गणेश विसर्जन मिरवणुकीत लाखोंच्या रुपयातून डीजे लावून मूर्तीसमोर धांगडधिंगाना घातला जात असताना… याच हिमायतनगर शहरात दुसरी बाजू म्हणजे शिवनेरी प्रतिष्ठानच्या ओम बाल गोपाळ गणेश मंडळाच्या नवतरुण युवकांनी सर्व मंडळांनी आदर्श घ्यावा असा उपक्रम राबविला आहे. हे त्यांचे दुसरे वर्ष असून, यावर्षी सुध्दा गणपती उत्सव आनंदाने साजरा करून “ओम बाल गोपाळ गणेश मंडळ” वाढोणाच्या सदस्यांनी उद्याची भावी पिढी घडविणारी आपली शैक्षणिक मातृसंस्था असलेल्या जि.प्र.प्रा.कन्या शाळेच्या वर्गखोलीला डिजिटल करण्याचा मानस व्यक्त केला आहे. उत्सव संपताच या शाळेतील वर्गखोली रंगविण्याचे काम सुरु झाले आहे.
श्री च्या मिरवणुकीत कोणताही गाजा-वाजा न करता तसेच इतर अनावश्यक खर्च न करता जि.प्र.प्रा.कन्या शाळा हिमायतनगर या शाळेतील एक वर्ग खोली रंग रंगोटी करून पूर्ण खोलीला पुठी मारून डिजिटल करण्याचे सर्व मंडळातील सदस्यांनी ठरवले आणि त्याचे काम सुद्धा अंतिम टप्यात आले आहे. त्यासाठी जवळपास वीस हजार (20,000) रूपये खर्च केला जात आहे. गेल्या वर्षी सुद्धा या मंडळाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांचा पोषण आहार खिचडी शिजवण्यासाठी एक मोठे पातेले आणि त्यावरची झाकणी जवळपास पंधरा हजार रुपये (15, 000) देऊ केले होते. तसेच शाळेतील प्रांगणात पेव्हर ब्लॉक करण्यासाठी सुद्धा या मंडळाचे खूप मोठे योगदान ठरले आहे. एकीकडे शासन जिल्हा परिषद शाळा बंद करण्याच्या मार्गावर असताना हे मंडळ त्यापैकी एक शाळा वाचवण्याचा प्रयत्न करत आहे असेच म्हणावे लागेल.