आयुष्यमान कार्ड मोहिमेत नांदेड जिल्ह्याची घोडदौड केंद्र शासनाने केले कौतुक
नांदेड| देशातील प्रत्येक नागरिकांच्या चांगल्या आरोग्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने आयुष्यमान भारत अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांच्या मार्गदर्शनात नांदेड जिल्ह्यात आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी घोडदौड सुरू असून आयुष्यमान कार्डच्या अनुषंगाने दररोज केलेल्या कामाचे मूल्यांकन करण्यात येते.
विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून आदिवासी जिल्ह्यांमध्ये नांदेड जिल्हा रविवार दिनांक १५ नोव्हेंबर रोजी केलेल्या कामकाजात देशात दुसऱ्या क्रमांकावर राहिला. विशेषता रविवार आणि दिवाळीची सुट्टी असताना देखील आरोग्य कर्मचाऱ्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रीय हेल्थ ऑथॉरिटी यांनी जिल्ह्याचे अभिनंदन केले आहे. मागच्या सात दिवसांमध्ये म्हणजेच प्रामुख्याने दिवाळीच्या सणासुदीमध्ये एकूण २५ हजार ७३० व्यक्तींचे आयुष्मान कार्ड्स काढण्यात आले. जिल्ह्यामध्ये सध्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य या योजनेचे एकत्रित लाभार्थी संख्या जवळपास २२ लाख ८९ हजार ४४१ आहे. त्यापैकी २३% व्यक्तींचे कार्ड्स आजपर्यंत काढण्यात आलेले आहेत. सध्या मराठवाडा विभागात नांदेड चा पहिला क्रमांक आहे. या कामात आरोग्य विभागाचे सर्व कर्मचारी तळमळीने काम करत आहेत. सध्या बऱ्याच दिवसापासून nhm च्या कर्मचाऱ्यांचा राज्यव्यपी संप असून सुद्धा सीईओ मिनल करनवाल तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ बालाजी शिंदे यांनी नांदेड मध्ये आरोग्य यंत्रणेने चांगले काम केल्याबाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
या कामात अंगणवाडी सेविका, उमेद, शिक्षक, ग्रामपंचायत कर्मचारी यांनी सुद्धा मोलाचे सहकार्य केलेले आहे. मागील एक महिन्यात १ लाख ८६ हजार ३९४ व्यक्तींचे कार्ड्स जिल्ह्यात काढण्यात आले आहेत. राज्यामध्ये प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना ही एकत्रित रित्या राबविली जाते. यांमध्ये २८ जुलै २०२३ च्या शासन निर्णयानुसार पिवळी शिधापत्रिका धारक, केशरी शिधापत्रिका धारक, अन्नपूर्णा कार्ड धारक, शुभ्र शिधापत्रिका धारक (शासकीय व निमशासकीय कर्मचारी सहित) व इतर निकषात बसणारे सर्व लाभार्थी आहेत. या योजनेत एकूण १३५६ रोगावरील उपचाराचा खर्च योजनेच्या अंगीकृत दवाखान्यात प्रति वर्ष प्रति कुटुंब ५ लक्ष पर्यंत मर्यादित असून तो लाभार्थ्याना मोफत असणार आहे. शासनाची महत्वाकाक्षी अशी ही योजना असून, याद्वारे सामान्यांचा आरोग्यावर खर्च होऊन गरिबीच्या खाईत ढकलले जाण्यापासून बचाव होणार आहे. या मोहिमेत नांदेड जिल्ह्याची घोडदौड सुरू असून नांदेड जिल्हा देशपातळीवर आघाडीवर आहे.
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल कारनवाल यांच्या मार्गदर्शनात सर्वत्र ही मोहीम राबविण्यात येत आहे. ग्रामपंचायत स्तरावर केंद्र संचालक यांच्यामार्फत प्रत्येक गावात अंगणवाडी कार्यकर्ती व आशा वर्कर यांच्यामार्फत दररोज २० व्यक्तींची नोंदणी करण्याचे नियोजन आहे. रेशन दुकानात येणारे लाभार्थी यांनी कार्ड काढले आहे की नाही याची खात्री करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहेत. तसेच घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना सुद्धा कार्ड काढण्यात येत असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी सांगितले. आयुष्यमान भारत अभियानामध्ये सर्व नागरिकांनी सहभागी होऊन नोंदणी करावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.