नांदेड,अनिल मादसवार। समाज विघातक जाळपोळ, कायद्याचे पालन न करणे, झुंडगिरी करणे यात सर्वांनाच भरडावे लागते. ज्या काही आजवर दंगली झालेल्या आहेत त्याचे दुष्परिणाम सर्वसामान्यांसहित सर्व समाजांनी भोगलेले आहेत. रोजचे शांततामय जीवन आणि जीवन व्यवहार जर सुरळीत चालवायचे असतील तर रस्त्यावरील समाज विघातक कृत्याचा निषेध केला पाहिजे. सकल मराठा समाजाने आजवर ज्या शांततेने आंदोलन केले त्याला जर कोणी गालबोट लावत असेल तर सकल मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी अशा लोकांना बाजुला करून त्यांचे प्रबोधन करणे आवश्यक आहे. शांतता व कायदा व सुव्यवस्थेला जर कोणी आव्हान देत असेल तर अशा समाजकंटकाविरूद्ध कायदेशीर बडगा आम्ही उगारून कठोर कारवाई करू, असा इशारा विशेष पोलीस महानिरीक्षक शशिकांत महावरकर यांनी दिला.

सकल मराठा समाजाच्या विविध पदाधिकाऱ्यांसमवेत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, छावा प्रदेशाध्यक्ष पंजाबराव पाटील काळे, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष माधवराव पाटील देवसरकर, छावा क्रांतीवीर सेनाचे प्रदेशाध्यक्ष राजेश मोरे, छावा जिल्हाध्यक्ष दशरथ पाटील कपाटे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील कोल्हे, विभागीय अध्यक्ष संकेत पाटील, सकल मराठा समाजाचे सुनिल पाटील कदम, अविनाश कदम, स्वप्नील सुर्यवंशी, संतोष माळकवठेकर, सदा पुयड, तिरूपती भगनूरे व विविध प्रतिनिधी उपस्थित होते.

समाजकंटकाविरूद्ध कठोर कारवाईचा इशारा – जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत
सर्वसामान्यांच्या जीविताचे रक्षण, सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण हे मूल्य आपण स्वराज्याच्या लढ्यातून घेतले आहे. या मूल्यांवरच महाराष्ट्राने आजवर वाटचाल केली आहे. मराठा आरक्षण आंदोलनाच्यानिमित्ताने काही ठिकाणी आजवर आपण जपलेल्या स्वराज्याच्या लढ्यातील मूल्यांवरच घाला घातल्याचे आपण पाहत आहोत. काही ठिकाणी हिंसक घटना झाल्या. या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातून शांततेचा संदेश जावा यादृष्टीने सकल मराठा समाजाच्या सर्व पदाधिकाऱ्यांसमवेत जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासना समवेत झालेल्या बैठकीत सकल मराठा समाजाच्या सर्व सन्माननिय सदस्यांनी समंजस भूमिका घेऊन कोणत्याही स्थितीत जाळपोळ व हिंसा करणाऱ्यांची बाजू सकल मराठा समाज घेणार नाही हे जाहीर केले आहे.

त्यांच्या या भावनेचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी म्हणून स्वागत करतो. शांतताप्रिय लढ्यासाठी प्रशासनाही मदतीला आहे, हे आश्वस्त केले. मात्र या शांतताप्रिय आंदोलनात समाजकंटक सामान्य जनतेला त्रास देत असतील, जाळपोळ, तोडफोड करत असतील, कायद्याचे उल्लंघन करत असतील तर अशा समाजकंटकाविरूद्ध कायद्याप्रमाणे आम्ही कठोर कारवाई करण्यासाठी तत्पर राहू असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी स्पष्ट केले. याचबरोबर जिल्ह्यातील कोणताही मार्ग, रस्ता बंद होणार नाहीत याची दक्षता घेण्याच्या सूचना पोलीस विभागाला दिल्याचे त्यांनी सांगितले.

कोणत्याही स्थितीत जाळपोळ व झुंडगिरीचे समर्थन नाही- माधवराव पाटील देवसरकर
कोणतेही हिंसक वळण या आंदोलनाला कोणीही द्यायचा प्रयत्न करू नका. आपला जीवसुद्धा तेवढाच किंमती आहे. भावनिक होऊन टोकाचे पाऊल उचलणे यात आपला आत्मघात आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. काही ठिकाणी वाहनांची तोडफोड करण्यात आली. रुग्णवाहिकांची तोडफोड झाली. आजवर ज्या शांततेच्या मार्गाने सर्वांनी आंदोलन केले त्याला लागलेले हे गालबोट आहे. संपूर्ण चळवळीला अशा घटनांमुळे बदनामीला सामोरे जावे लागते. कोणत्याही स्थितीत सकल मराठा समाज हा अशा दुष्कृत्यांचे, समाज विघातक कार्याचे समर्थन करणार नाही, असे स्वाभीमानी संभाजी ब्रिगेटचे संस्थापक अध्यक्ष माधवराव पाटील देवसरकर यांनी सांगितले.

कोणीही कायदा हातात घेऊ नये – पंजाबराव काळे
रस्त्यावरील जाळपोळ व आंदोलनाचा इशारा सकल मराठा समाजाने दिलेला नाही. असे जे कृत्य करणारे आहेत त्या समाजकंटकांना शांततेचा भंग करण्यासाठी, शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाला बदनाम करण्यासाठी चिथावून दिल्याची शक्यता अधिक आहे. सर्व मराठा समाजातील तरुणांना आमचे नम्र आवाहन आहे की त्यांनी कायदा हातात घेऊन कोणतेही समाज विघातक कृत्य करू नये. कोणीही रस्त्यावर टायर जाळणे, रस्ता आडवणे असे कृत्य करू नये, असे आवाहन आखील भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष पंजाबराव काळे यांनी केले. याचबरोबर बालाजी इंगळे, स्वप्नील पाटील तळणीकर, संतोष माळकोटीकर यांनी आपल्या भावना या बैठकीत व्यक्त केल्या.

समाजकंटकाविरुद्ध कायदेशीर कारवाईची मागणी – संकेत पाटील
शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाला काही व्यक्ती गालबोट लावण्याचा प्रयत्न करीत आहेत. सकल मराठा समाज हा रस्त्यावर विध्वंस करणाऱ्या, जाळपोळ करणाऱ्या कोणत्याही व कोणाच्याही कृत्याचे समर्थन करीत नाही. अशा समाजकंटकांना वेळीच वटनीवर आणण्यासाठी कायदेशीर कारवाई करा, अशी आमची मागणी असल्याचे संभाजी बिग्रेड नांदेड विभागीय अध्यक्ष संकेत पाटील यांनी या बैठकीत केली.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version