हदगाव,शेख चांदपाशा| तालुक्यातील मनाठा, मानवाडी, अंबाळा यापैकी एका ठिकाणी होणाऱ्या नियोजित हदगाव रेल्वे स्टेशनला हदगाव शहराचे रहिवाशी स्वर्गीय माजी खा. हरिहरराव सोनुले यांचे नाव देण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सचिव रमेश नरवाडे उमरीकर यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव तसेच रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे येथील उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्यामार्फत केली आहे.
रमेश नरवाडे यांनी याबाबतीत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, माजी स्वर्गीय खा. हरिहरराव सोनुले हे हदगाव शहरातील रहिवाशी होते. त्यांचे सर्वच भाषेवर प्रभुत्व होते अतिशय हुशार संसदपट्टू म्हणून त्यांची ख्याती सर्वदूर होती. संसदेत तत्कालीन पंतप्रधान स्व.पंडित जवाहरलाल नेहरु यांनी त्यांची संसदेतले इंग्रजीतले भाषण ऐकून पाठ ही थोपटली होती.ते कवी, साहित्यिक होते त्यांच्या कविता आजही नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीच्या अभ्यास क्रमात आहेत. स्वर्गीय माजी खा .हरिहरराव सोनुले हे स्वातंत्र्य सैनिक ही होते.
माजी केंद्रीय मंत्री डॉ.शंकरराव चव्हाण, माजी कुलगुरु दिवंगत गो.रा.म्हैसेकर, ज्येष्ठ पत्रकार तथा रेल्वे संघर्ष समितीचे अभ्यासू दिवंगत सुधाकरराव डोईफोडे सह आदी विद्वान लोकांच्या बैठकीतले माजी खा. स्वर्गीय हरिहरराव सोनुले एक हुशार व्यक्तिमत्व होते. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेने हदगाव शहरात त्यांनी त्याकाळत ‘आदर्श विद्यार्जन मंडळाची स्थापना करून गोरगरीब मुलांच्या शिक्षणाची सोय केली आहे.
हदगाव तालुक्यातील जनतेच्या त्यांच्या प्रति असलेल्या भावना लक्षात घेऊन नियोजित हदगाव परिसरात होणाऱ्या रेल्वे स्टेशनला दिवंगत मा.खा. हरिहरराव सोनुले असे नाव देण्यात यावे असे त्यांनी म्हटले आहे. निवेदनाच्या प्रती केंद्रीय सामाजिक मंत्री डॉ.रामदास आठवले, जिल्हाधिकारी नांदेड, हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील, नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर, हदगावचे आमदार माधवराव पाटील जळगावकर आदींना दिल्या आहेत.