नांदेड| पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ व्हॉलीबॉल (मुले) स्पर्धेतील बाद फेरीतील सामने रंगतदार होत आहेत. साखळी फेरीत दाखल होण्यासाठी प्रत्येक संघ जोरदार प्रयत्न करत आहेत. यजमान स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडच्या संघाने बाद फेरीत चार सामने जिंकून विजयी चौकार मारला. साखळी फेरीत दाखल होण्यासाठी बारा संघात मोठी चुरस पहायला मिळणार आहे.
पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ व्हॉलीबॉल (मुले) स्पर्धेचे आयोजन दि.१४ ते १८ डिसेंबर या कालावधीत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, विष्णूपुरी, नांदेड येथे करण्यात आले आहे. विविध मैदानावर दिवस-रात्र होत असलेले बाद व साखळी पद्धतीने सामने खेळवले जात आहेत. ‘क’ ग्रुप मधील यजमान नांदेड संघाच्या खेळातील कामगिरीकडे उपस्थित क्रीडा प्रेमीचे लक्ष लागले आहे. संघातील खेळाडूंची सांघिक कामगिरी बहरत आहे. त्यामुळे नांदेड विद्यापीठाने गुजरात टेक्नॉजीकल विद्यापीठ, अहमदाबाद, कोटा विद्यापीठ, आर.टी.यु. विद्यापीठ कोटा, अटमिया विद्यापीठ, राजकोट संघाला पराभूत करण्याची किमया साधली आहे.
‘अ’ ग्रुप मध्ये असलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर संघाने चार सामने जिंकून आपले स्थान पक्के करण्याचा प्रयत्न केला आहे. या संघाने गोवा विद्यापीठ, सोमय्या विद्याविहार विद्यापीठ, मुंबई, परूल विद्यापीठ, वडोदरा, महाराजा गंगासिंग विद्यापीठ, बिकानेर संघाचा पराभव केला.
‘ब’ ग्रुपमधील शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर संघानेही बाद फेरीतील चार सामने जिंकले आहेत. त्यांनी भगवान महावीर विद्यापीठ, सुरत, राष्ट्रीय रक्षा विद्यापीठ दहेगम, गांधीनगर, लोकजागृती केंद्र विद्यापीठ, अहमदाबाद व जनार्दन रायनगर राजस्थान विद्यापीठ, उदयपूर या संघाचा पराभव केला. ‘ड’ ग्रुपमध्ये मुंबई विद्यापीठाने चार सामने जिंकून आपले साखळीत स्थान पक्के करण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्यांनी कामधेनू विद्यापीठ, गांधीनगर, गुजरात, महाराजा सयाजीराव विद्यापीठ, बरोडा (वरदोदरा) एम.आय.टी. वल्ड पीस विद्यापीठ, पुणे व गोविंद गुरू ट्रायबल विद्यापीठ, बनसावरा या संघाचा पराभव केला.
बारा संघात चुरस
बादफेरीत खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करणारे आठ संघ व मागील वर्षाचे चार पात्र संघ असे १२ संघ एकमेकाशी झुंजणार आहेत. त्यामुळे १२ संघात साखळी फेरीत दाखल होण्यासाठी मोठी चुरस वाढली आहे. या स्पर्धा कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, क्रीडा व शारीरिक शिक्षण प्रभारी संचालक डॉ. मनोज रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. श्रीकांत अंधारे, अंकुश पाटील, विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, डॉ. गंगाधर तोगरे, महेश पाळणे, डॉ. महेश वाखरडकर, संजयसिंह ठाकूर, डॉ.सचिन चामले, तांत्रिक समितीचे विक्रम पाटील, सुधीर दापके, सचिन पाळणे, विजय उपलंचवार, डॉ. दिलीप भडके तसेच पंचप्रमुख पी.एस. पंत, एस.डी. आचरेकर, अनिल गिराम, शाहुराज रोकडे, चंद्रकांत पोलकटवार, विठ्ठल कवरे, शहाबाज पठाण, सुनील मुनाळे, प्रकाश मस्के, मोहम्मद कासिम, सोनाली बोरकर, शेजल वैद्य आदीसह राज्य पंच समितीच्या सदस्य परिश्रम घेत आहेत.