नांदेड| ज्येष्ठ नागरिकांची “जागृती बैठकित दि.26 मार्च 2023 रोजी संपन्न झाली. या बैठकीत डॉ.हंसराज वैद्य हे मार्गदर्शन करत होते. अध्यक्षिय समारोपात बोलताना ते म्हणाले की, आजपर्यंतच्या पहाणीत तर असे दिसून आले आहे की, सत्तेतील व सत्तेबाहेरील एकाही राजकीय पक्षाच्या “निवडणूक जाहिरनाम्यात” ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्यांचा साधा उल्लेखही केलेला दिसत नाही. ज्येष्ठांना तथा त्यांच्या प्रलंबित प्रश्नांना स्थान दिलेले दिसत नाही. म्हणजेच काय तर कोण्याही पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना एकूण जनसंख्येच्या आठरा टक्के एवढ्या ज्येष्ठ नागरिक समूहाच्या मतांचे महत्व कळले नाही! गरज वाटत नाही. त्यांना गृहित धरले जात आहे. ते सर्वच जन एकमेकाच्या पक्षातील नेत्यांना तथा कार्यकर्त्यांना आपल्या पक्षात प्रवेशित करून घेऊन, होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणूका जिंकण्याच्या भ्रामक कल्पनेच्या नादी लागल्याचेच चित्र दिसत आहे.!
हजारो गरिब, गरजवंत, दुर्लक्षित, शोषित, उपेक्षित, वंचित झोपड पट्टीतील व ग्रामिण भागातील शेतकरी, शेत मजूर, कष्टकरी, कामगार, विधवा आणि दिव्यांग ज्येष्ठ नागरिक आपल्या प्रलंबित मागण्या तथा प्रतिमहा रू.3500/- शेजारील आंध्र, कर्णाटक व तेलंगाना राज्यांच्या धर्तीवर मिळावेत म्हणून “लक्षवेधी पद यात्रेत”, तळपत्या ऊन्हात सहभागी झाले. पण कुण्याही राजकीय पक्षांना ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांचे गांभीर्य कळले नाही! डोळे उघडे ठेऊन त्यांनी ते पाहिले नसावे! आपल्या सख्या ज्येष्ठ आई-वडिलांची तथा जनता जनार्दन माय-बापांची त्याना आठवणही होऊ नये हेच मोठे आश्चर्य म्हणावे लागूल!.
सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना विनंती, निवेदने जिल्हाधिकारी साहेबांमार्फत पाठविली. देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी साहेबांना ई-मेलद्वारेही पाठविली. सुहृदयी प्रसिद्धी तथा प्रसार माध्यमांनीही त्याची चांगलीच दखल घेतली! तरी पण सत्ताधारी वा विरोधी पक्षांतील राजकारण्यांनी अजून तरी दखल घेतलेली दिसत नाही. आम्ही जरी “अन्नपाणी त्याग” निर्णय जाहिर केला असला तरी, आम्ही आजूनही केंद्र तथा राज्य शासनाबद्दल सकारात्मकच आहोत!
कुटूंब, समाज, स्थानिक लोक प्रतिनिधी, आजी-माजी आमदार-खासदार, आजी-माजी मंत्री तथा मुख्य मंत्री, इच्छूक उमेद्वार,एकूणच राजकीय पक्षांनां आमची ज्येष्ठांची तथा आमच्या मतांची किंमतच नसेल, आमच्या मतांची त्यांना गरजच नसेल तर आपली नाराजी दाखविण्या साठी का होइना आम्हाला “नोटा”चाच पर्याय शिल्लक रहातो. खरं तर शासनांनी व इतर राजकीय पक्षांनी आम्हा ज्येष्ठ नागरिक समूहाचा अंत पाहू नये. ज्येष्ठांच्या आज पर्यंतच्या देश तथा राष्ट्र सेवेचा आदर करायला हवा. प्रत्येक पक्षाने आपल्या निवणूक जाहिरनाम्यात ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांच्या बाबतीत उहापोह करायला हवा.
शासनांनीही ज्येष्ठ नागरीकांना तात्काळ न्याय द्यायला हवा. सहानुभूतीने सकारात्मक पाऊल उचलायला हवेत. ते शेवटी म्हणाले नेत्यांनो, आमच्यावर “नोटा”चा पर्याय शोधण्याची वेळ आणू नका! नापसंती दाखविण्याची अर्थात शेवटचे गुलाबी बटण शोधण्याची व दाबण्याची वेळ आणू नका! अजुनही वेळ गेलेली नाही, असा ईशारा ज्येष्ठ नागरिकांच्या 26 मार्च 2023 रोजी झालेल्या बैठकीत राज्यकर्ते व शासनाला देण्यात आला असल्याची माहिती डॉ.हंसराज वैद्य यांनी दिली.