हिमायतनगर,अनिल मादसवार। आयोध्या नगरीतील प्रभू श्रीराम मंदिरात दिनांक 22 रोजी होणाऱ्या प्रभू श्रीराम मूर्ती स्थापनेच्या ऐतिहासिक सोहळ्याचे लाईव्ह प्रक्षेपण होताना हिमायतनगर शहरातील विविध अकरा समाजातील दांपत्याचे हस्ते आरती पूजा केली जाणार आहे. हा बहुमान श्री परमेश्वर मंदिर समितीच्या वतीने त्यांना देण्यात आला असल्याची माहिती महावीरचंद श्रीश्रीमाळ यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.
500 वर्षांनंतर अयोध्येत प्रभू श्रीरामांचं मंदिर उभं करण्यात आले असून, उद्या दि.22 रोजी श्रीराम प्रभूच्या बालमूर्ती ची स्थापना होणार आहे. या ऐतिहासिक भव्य मंदिराचा प्राण प्रतिष्ठापन सोहळा याची देही याची डोळा बघायला जाणं अशक्य असल्यामुळे हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टच्या वतीने सर्व भाविकांना परमेश्वर मंदिरात लाईव्ह टेलिकास्ट द्वारे श्रीराम मंदिराचा प्रतिष्ठापन सोहळा दाखविण्याची तयारी करण्यात आली आहे.
अयोध्येतील श्रीराम मंदिराचं येत्या 22 जानेवारीला लोकार्पण होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत रामलल्लांची प्राण प्रतिष्ठा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर श्री परमेश्वर मंदिराच्या कडून जयत तयारी करण्यात आली असून मंदिरासह परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे तसेच ठिकाणी भगवेदन लावण्यात आल्यामुळे हिमायतनगर शहर भगवे मे दिसून येत आहे दिनांक 22 रोजी सकाळी आठ वाजता शहरातील मुख्य रस्त्याने हजारो महिलांची भव्य कलश यात्रा काढण्यात येणार आहे सरळ यात्रा परत आल्यानंतर श्री परमेश्वर मंदिरात आयोध्या येथील श्री राम लल्लाच्या मूर्ती स्थापनेचा सोहळा लाईव्ह कार्यक्रम दाखविण्यात येणार आहे.
या प्राण प्रतिष्ठापणा सोहळ्यचं लाईव्ह टेलिकास्ट होताना हिमायतनगर शहरातील 11 जाती धर्मातील दाम्पत्यास पूजा आरती करण्याचा मान देण्यात आल्याची माहिती महावीरचंद श्रीश्रीमाळ यांनी दिली आहे. या पूजेचा बहुमान मिळालेल्या मध्ये आदिवासी, बौध्द, मातंग, कैकाडी, वडार, गोसाई, चांभार, भोई, पारधी, वैदू आणि वासुदेव समाजातील पती-पत्नी दाम्पत्यांच्या सामावेश आहे. या अद्भुत सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी हिमायतनगर शहर व पंचक्रोशीतील नागरिकांनी श्री परमेश्वर मंदिरात उपस्थित होऊन आयोध्येतील सोहळा अनुभवण्याचा लाभ घ्यावा असे आवाहनही मंदिर कमिटी व गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.