
श्रीक्षेत्र माहूर, कार्तिक बेहेरे। शहरातून जाणाऱ्या महामार्गावर फेरीवाले, हातगाडेधारक,अस्थाई दुकानदार, चारचाकी व तीनचाकी वाहनाने अवैध ताबा केल्याने रहदारीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे. सदरचे अतिक्रमण तातडीने हटवा अशी मागणी युवा ग्रामीण पत्रकार संघाने नगर पंचायतीचे मुख्याधिकारी राजकुमार राठोड यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
युवा ग्रामीण पत्रकार संघाने मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात माहूर शहर हे मोठे धर्मीक स्थळ असून तालुक्याचे ठिकाण असल्याने भाविकांसह खेड्यापाड्यातून येणाऱ्या नागरिकांची मोठी गर्दी असते, असा उल्लेख केला आहे. तसेच या शहरातून गेलेल्या महामार्गावर फळ विक्रेते व मोकाट जनावरांनी ताबा केल्याची बाब नमूद केली आहे.
याशिवाय खाजगी चारचाकी,तीनचाकी वाहने आणि दुकानदारांनी सर्व्हिस रोडवर पूर्णपणे ताबा मिळविल्याने रहदारीला मोठा अडथळा निर्माण झाला असून पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन चालावे लागत असल्याची गंभीर बाब त्यात निदर्शनास आणून दिली आहे.सदरच्या अतिक्रमणाने कधीही मोठा अनर्थ घडू शकतो अशी भीतीही वर्तविली आहे.निवेदनावर पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष गोपाल खापर्डे, उपाध्यक्ष समाधान कांबळे,आदेश बेहेरे, मनोज जाधव आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
निवेदन देऊन चार दिवस लोटले,परंतु अपेक्षित कार्यवाही सुरू झाली नसल्याने नगर प्रशासन गंभीर नसल्याची प्रचिती येते. अशी प्रतिक्रिया गोपाल खापर्डे यांनी दिली.
