नांदेड| शासनाचे कंत्राटी भरतीचे धोरण घातक असून, जिल्हा परिषद शाळांचे खाजगीकरण केल्यास शिक्षणाचा दर्जा ढासळेल एवढेच नव्हे तर शाळा-शाळांमधून गौतमी पाटील तयार होण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे शासनाने कंत्राटी आणि खासगीकरणाचे धोरण रद्द करावे, असे प्रतिक्रिया माजी केंद्रीय राज्यमंत्री तथा भाजपा नेत्या सूर्यकांताताई पाटील यांनी व्यक्त केली. तसेच खासगीकरणासह अन्य विषयांवरसुद्धा श्रीमती पाटील यांनी टीका करीत शासनाचे डोळे उघडण्याचा प्रयत्न केला.
येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेच्या वतीने आयोजित नियोजन भवनात शेतकरी मेळाव्याच्या मंचावरून त्या बोलत होत्या. यावेळी मंचावर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते. अध्यक्षस्थानावरून बोलताना सूर्यकांताताई पाटील म्हणाल्या की, राज्यातील जनतेला सुरक्षा, शिक्षण आणि आरोग्यसेवा पुरवणे हे सरकारचे कर्तव्य आहे. या व्यवस्थेशी संबंधित सर्व विभागामध्ये मोठ्या प्रमाणावर रिक्त जागा झाल्या आहेत तरी त्या ठिकाणी आपलेच शासन कंत्राटी कर्मचारी भरण्याचा प्रयोग करीत आहे. हा प्रयोग अत्यंत घातक आहे. तो करु नका, असा सल्ला माजी केंद्रीय राज्यमंत्री अन् आजघडीला भाजपत असलेल्या ताईनी महसूलमंत्र्यांच्या उपस्थितीत दिला, यामुळे चर्चेला उधाण आले आहे.
नांदेड जिल्ह्यातील एकमेव महिला नेत्या ज्यांनी पूर्ण राज्यात नव्हे तर केंद्रातही आपले बलस्थान निर्माण केले होते. त्यांचा इतिहास पाहता त्या कधीच सत्य बोलायला डगमगल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्या या धाडसी वक्तव्याचे सर्वत्र कौतुकच केल्या जात आहे. बऱ्याच कालखंडानंतर ताईंना व्यासपीठ मिळाले होते. ताई राजकारणात राहणार की नाही, यासंदर्भात तर्कवितर्क लढवले जात असतानाच रविवारी झालेल्या सभेत ताई कडाडल्या.
विखे पाटील यांच्या सहकार व इतर क्षेत्रातील कार्याचा ताईंनी उल्लेख करून हीच परंपरा कायम पुढे न्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. कंत्राटी भरतीचा निर्णय ताबडतोब रद्द करण्याची मागणीदेखील त्यांनी यावेळी केली. हे धोरण पुढे नेल्यास शाळा शाळांमध्ये गौतमी पाटीलला नाचवण्याचे प्रयोग सुरू होतील. त्याहीपेक्षा भयावह परिस्थिती निर्माण होण्याची शक्यतादेखील ताईंनी आपल्या भाषणातून व्यक्त केली. त्याचप्रमाणे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी शनिवारी घेतलेल्या अतिविराट सभेचा उल्लेख करून मराठा समाजाच्या भावनेचा आदर करून शासनाने मार्ग काढावा, तसेच टिकणारे आरक्षण देण्याच्यादृष्टीने प्रयत्न करावे, असेदेखील त्या यावेळी म्हणाल्या. आजघडीला आमच्याकडे कुठलेच काम नसल्यामुळे कोणीही आमच्या दारी येत नाही. आम्हाला कार्यकर्त्यांचा नेता कधीच करता आला नाही, त्यामुळे अनेक अडचणी आल्या. परंतु पश्चिम महाराष्ट्रातील माणसे सगळीकडे काम करतात. त्यांची पोरं उद्योगधंद्यातही आघाडीवर असतात. घरातील सर्वच मंडळी राजकारणात कधीच नसतात. याउलट आमच्या मराठवाड्यात लोकसभा, विधानसभा, नगरपालिका, ग्रामपंचायत नाहीतर गावातील सोसायटीच्या निवडणुकीत अख्खे घर गुंतलेले असते.
मराठवाडयातील तरुण मुले उद्योगधंद्याकडे वळतच नाहीत, तर मराठवाड्यातील शेतकरी आभाळाकडे डोळे लावून असतात. शासनाने सेंद्रिय खतावरुन रासायनिक खतावर शेती आणली आमच्या अन्नाचा सत्यानाश केला. पूर्वी पाच-दहा कॅन्सरचे रुग्ण आढळत होते आता ते घराघरात दिसून येत आहेत. केंद्राला कॅन्सर मंत्रालय सुरू करावे लागण्याची वेळ येऊ नये. प्रत्येक जिल्ह्यात कॅन्सर रुग्णालय उभारावे लागेल, हे भीषण वास्तव आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्याने रासायनिक खतापेक्षा सेंद्रिय खत वापरण्यावर भर द्यावा, असेही ताई शेवटी म्हणाल्या.