मयत देवराये कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत देण्याची आ. जवळगावकर यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी
मुंबई/नांदेड/हिमायतनगर। मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी साखळी उपोषणाला बसलेल्या कामारी येथील सुदर्शन देवराये या युवकांने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. सदरील मयताच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता मधून मदत देण्याची मागणी आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे भेट घेऊन केली आहे.
हिमायतनगर तालुक्यातील कामारी येथील सुदर्शन देवराये या तरुण युवक मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या साखळी उपोषणाला बसुन होता. आपल्या समाजाला आरक्षण मिळत नाही या विवंचनेत राहून सुदर्शन देवराये या युवकांने आपल्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. यामुळे मराठा समाज बांधवाने हिमायतनगर शहर कडकडीत बंद करून सरकारचा निषेध केला आहे.
त्याबरोबरच संतापलेल्या सकल मराठा समाजाने पोलीस ठाण्यात दिवसभर ठिय्या आंदोलन केले होते. या घटनेवरून जिल्हाधिकारी पोलीस अधिक्षक यांच्या अश्वासनानंतर सदरील आंदोलन शांत झाले सदरील घटनेला पंधरा दिवस झाले तरी शासनाने देवराये कुटुंबियांना मदत केली नाही. सदरील देवराये कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी मदत देण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांनी पाठविला आहे.यासंदर्भात दि. 26 सप्टेंबर रोजी आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मंत्रालयात भेट घेऊन देवराये कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी मंजूर करण्यात यावा अशी मागणी केली आहे.