नांदेड| जिल्हा परिषद अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या हजेरीसाठी आता क्यूआर कोड बसवण्यात आल्याची असल्याची माहिती नांदेड जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी ही माहिती दिली आहे. यासाठी गाव स्तरावर 7 हजार 853 क्यूआर कोड लावण्यात आले आहेत. त्यामुळे आता वरिष्ठांना हजेरीची ऑनलाईन माहिती मिळणार आहे.
ग्रामीण भागात तसेच दुर्गम भागात कर्मचारी गावात वेळेत उपस्थित राहत नाहीत. काही वेळा अनुपस्थित राहतात अशा तक्रारी वारंवार जिल्हा परिषदेला येत होत्या. त्या अनुषंगाने ग्राम पातळीवरील कर्मचारी गावात वेळेत उपस्थित राहून आपले कर्तव्य बजवावे यासाठी गाव स्तरावर कर्मचारी उपस्थितीसाठी क्यूआर कोड बसविण्याचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी घेतला आहे.
ग्रामीण भागात शिक्षक, ग्रामसेवक, आरोग्य पर्यवेक्षीका, अंगणवाडी पर्यवेक्षीका, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातील कर्मचारी, पशुसंवर्धन विभागाचे कर्मचारी यांच्या उपस्थिती क्यूआर कोडव्दारे घेण्यात येत आहे. कार्यालयातील उपस्थिती पटानंतर सर्व कार्यालयात बायोमेट्रिक बसवण्यात आले होते. आता मात्र ग्रामीण भागातील कर्मचाऱ्यांसाठी क्यूकोड बसवण्यात आले आहेत.
हे कर्मचारी क्यूआर कोडद्वारे उपस्थिती नोंदवत आहेत. गावा-गावात क्युआर कोड लावण्याचे काम पूर्ण झाले आहे. यामध्ये ग्रामपंचायत स्तरावर 1 हजार 310 क्यूआर कोड, शाळा स्तरावर- 2 हजार 194, प्राथमिक आरोग्य केंद्र- 70, आरोग्य उपकेंद्र- 379, अंगणवाडी केंद्र- 2 हजार 963, मिनी अंगणवाडी- 759, पशु वैद्यकीय श्रेणी-1 दवाखाने- 74 तर पशु वैद्यकीय श्रेणी-2 च्या 104 दवाखाने असे एकूण 7 हजार 853 क्यूआर कोड लावण्यात आले आहेत. यामुळे आता ग्रामीण भागात कर्मचाऱ्यांची उपस्थिती राहून ग्राम विकासाची कामे मार्गी लागतील, असा विश्वास मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी व्यक्त केला आहे.