नांदेड| उघड्यावर राहणाऱ्या आणि या राज्यातून त्या राज्यात पोटाची खळगी भरण्यासाठी भटकणाऱ्या कुटुंबाची कहाणी खूपच यातनादायी आहे. आज इथं तर उद्या कुठंतरी असा संसाराचा रहाटगाडा ओढत नेतात; स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात उपेक्षित जीवन जगावे लागते यापेक्षा दुर्दैव काय असणार आहे? प्रशासनाने यांचे सर्वेक्षण करून हक्काची घरे आणि रोजगार उपलब्ध करून दिल्यास त्यांची जीवन जगण्याची त्यांची ससेहोलपट निश्चित थांबेल असे मत भटक्या विमुक्तांच्या सामाजिक व सांस्कृतिक चळवळीचे अभ्यासक मारोती कदम यांनी व्यक्त केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते शामराव वाघमारे, अशोक मल्हारे, स्तंभलेखक मारोती कदम, समीक्षक प्रज्ञाधर ढवळे यांची उपस्थिती होती.
येथील सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने शहरातील विविध भागात तात्पुरत्या स्वरूपात वास्तव्याला असलेल्या मणी, मोती, खेळणी, शोभिवंत वस्तू, औषधी, गृहोपयोगी वस्तू वगैरे विक्री करुन पोट भरणारे राज्यातील तथा परराज्यातील भटक्या विमुक्त जाती जमातीतील शंभराधिक कुटुंबांना टप्प्या टप्प्याने दिपावली निमित्त सप्तरंगी साहित्य मंडळाचे माजी राज्याध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक अनुरत्न वाघमारे, कार्यालयीन सचिव मारोती कदम, राज्य कोषाध्यक्ष शंकर गच्चे, कार्याध्यक्ष प्रज्ञाधर ढवळे यांच्या पुढाकारातून ‘आनंदाचा शिधा’ वाटप करण्यात आला. तसेच इतर सेवाभावी संस्थांना मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहनही यावेळी मंडळाच्या वतीने करण्यात आले.
दिवाळी हा सण आनंदाचा, उत्साहाचा तसाच तो खाद्यपदार्थांचाही उत्सव आहे. पण ज्याला स्वतःची म्हणून हक्काची जमीन नाही आणि स्वतःच म्हणून हक्काच छत नाही असे भटके-विमुक्त पावसाळ्याचे चार महिने जेमतेम कुठेतरी बुड टेकतात. मात्र, पावसाळा संपला की ते आजही पोटाची खळगी भरण्यासाठी गावोगाव फिरत असतात. काही कुटुंबे खलबत्ता, तवा, कढई, आटवा, चिमटे, चिपटे, पळी असे विविध गृहोपयोगी लोखंडी साहित्य रोडच्या कडेलाच आपले पाल उभ्या करुन विकताना दिसत आहेत. शहरातील स्टेडियम परिसर, रेल्वे स्टेशन परिसर, हिंगोली गेट, वाजेगाव धनेगाव परिसर अशा अनेक ठिकाणी ते वास्तव्याला आहेत. या कुटुंबांना राज्य सरकारच्या धर्तीवर जे कुटुंब लाभार्थीच नसलेल्या कुटुंबांना आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला.
समाजात आजही किती विषमता आहे. एकीकडे नवीन कपडे, दागिने, गाड्या घेऊन घरामध्ये विविध प्रकारचे खाद्यपदार्थ बनवून मोठ्या उत्साहाने दिवाळी साजरी केली जात आहे. तर एकीकडे परराज्यातील काही कुटुंबे ऐन दिवाळीच्या सणामध्येसुद्धा आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी ऊन-पावसाची, अंधाराची तमा न बाळगता उघड्यावर दुकान थाटून आपला उदरर्निवाह करत आहेत. स्टेडियम परिसरातील महावत जोगी जमातीच्या गौरी शंकर जोगी, गुड्डू जोगी, भोलू जोगी,दिमाग जोगी, रंजित जोगी, जाविर जोगी, अमर हरिलाल जोगी, मूड जिया पारधी या आठ कुटुंबातील सदस्यांनी आपल्या जगण्याची कैफियत मांडली.
सण उत्सवही उघड्यावरच होतात साजरे
आम्हाला हक्काच घर नाही की हक्काची जमीन नाही. पोटाची खळगी भरण्यासाठी आम्ही या राज्यातून त्या राज्यात फिरत असतो. आमची दिवाळी ही अशी रस्त्यावरच साजरी होत असते. दिवाळीसाठी गावाकडे जाण्याची ऐपतही नाही, अशी व्यथा परप्रांतीय महावत जोगी या भटक्या विमुक्तांच्या कुटुंबांनी सप्तरंगी साहित्य मंडळाकडे व्यक्त केली. तसेच लहान मुलांनी नवे कपडे आणि फटाक्यांची मागणी केली.
लहान मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न
‘या भटक्या लोकांची भटकंती थांबली पाहिजे. त्यांना आधार कार्ड मिळाले पाहिजे. परंतु हे होत नसल्याने पोटाची खळगी भरण्यासाठी ते भटकत राहतात. त्यामुळे त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण होत असतो. त्यांना शासनाने जमीन दिली पाहिजे. ते एकाच ठिकाणी राहतील. आपल्या कुटुंबात सण उत्सव साजरे करु शकतील आणि शिक्षण घेऊ शकतील.’ – प्रज्ञाधर ढवळे, नांदेड.