
नांदेड। येथील शासकीय रुग्णालयात 24 तासांत 24 मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर खळबळ उडाली आहे. या घटनेवरून शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांनी आज शासकीय रुग्णालयाच्या भेट देईल. यावेळी येथील घाणीची परिस्थिती व दुर्गंधी येत असल्याचे पाहून त्यांनी चक्क अधिष्ठात्यांकडून शौचालय साफ करवून घेतली आहे. पाटील यांनी या प्रकरणी रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरत रुग्णालयातील दयनीय अवस्था उघड केली आहे.
नांदेड शासकीय रुग्णालयात सोमवारी मागील 24 तासांत 24 मृत्यू झाल्याची बाब उजेडात आली होती. त्यात आणखी 7 मृतांची भर पडल्यामुळे बळींचा आकडा 31 वर पोहोचला आहे. या घटनेचे राज्यभर पडसाद उमटल्यानंतर शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांनी नांदेडच्या शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयाला भेट दिली. तिथे सर्वत्र घाणीचे साम्राज्य दिसून आले, त्यात रुग्णालयातील स्वच्छतागृह अतिशय घाणेरड्या स्थितीत होते. अनेक शौचालय ब्लॉक होते. काही ठिकाणी तर स्वच्छतागृहात देखील सामान ठेवलेले होते. यावरून खासदार हेमंत पाटील हे चांगलेच संतापले. त्यांनी रुग्णालय प्रशासनाला चांगलेच धारेवर धरत चक्क रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांना (डीन) शौचालय साफ करायला लावले. यानंतर रुग्णालयातील अधिकारी – कर्मचाऱ्यांची एकच भंभेरी उडाली होती.
यावेळी माध्यमांशी संवाद साधताना खा. हेमंत पाटील म्हणाले कि, रुग्णालयात सर्व अनागोंदी कारभार सुरू आहे. या प्रकरणातील दोषींवर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. रुग्णालयात सर्वत्र घाणीचे साम्राज्य आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. यातच औषधाचा देखील तुटवडा निर्माण झाला आहे. रुग्णालय प्रशासनातील दोषी अधिकाऱ्यांवर आणि डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी खासदार हेमंत पाटील यांनी केली.
