
नांदेड| तथागत गौतम बुद्ध आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या आदर्शवादाचा जीवनात अंगीकार केल्यास बुद्ध – भीम विचाराने वर्तनात इष्ट परिवर्तन होऊन जीवन सुखी होते असा अभिप्राय महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध प्रबोधनकार संतोष मंत्री यांनी नोंदविला. मार्गशीर्ष पौर्णिमेनिमित्त येथील सप्तरंगी साहित्य मंडळाची ७८ वी काव्यपौर्णिमा मुदखेड तालुक्यातील पाथरड रे. स्टे. येथील त्रिरत्न बुद्ध विहारात उत्साहात साजरी झाली. त्यावेळी मंत्री बोलत होते. यावेळी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अनुरत्न वाघमारे, कार्याध्यक्ष प्रज्ञाधर ढवळे, शाहीर आ. ग. ढवळे, कवी थोरात बंधू, कल्याण डोणेराव, ताजन थोरात, दिलीप जमदाडे आदींची उपस्थिती होती.
काव्यपौर्णिमा कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे मान्यवरांच्या हस्ते पुष्प, धूप, आणि दीप पूजन करून अभिवादन करण्यात आले. उपासक मारोती चव्हाण यांच्या सूचनेनुसार सामुदायिक त्रिसरण पंचशील ग्रहण करण्यात आल्यानंतर रीतसर काव्यपौर्णिमा कार्यक्रमास प्रारंभ झाला. यात कल्याण डोणेराव, प्रज्ञाधर ढवळे, आ. ग. ढवळे, थोरात बंधू, अनुरत्न वाघमारे, संतोष मंत्री यांनी सहभाग घेतला. यावेळी इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘एक वही- एक पेन’ एक दिवसीय अभियान राबविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी थोरात बंधू यांनी केले तर प्रास्ताविक व आभाराची धुरा जयवंत थोरात यांनी सांभाळली.
सरणत्तय घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विलास थोरात, नरहरी भिसे, राजू थोरात, चंद्रकांत थोरात, आनंद थोरात, जळाबाई थोरात, कमलबाई थोरात, प्रजावती रावळे, पद्मावती भिसे, पार्वतीबाई थोरात, वंदना थोरात, भीमाबाई थोरात, महादू थोरात, गौतम थोरात आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी पाथरड येथील बौद्ध उपासक, उपासिका, बालक, बालिका यांची उपस्थिती होती. यात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
