श्री सत्यात्मतीर्थ स्वामींचा नांदेड संचार २७ व २८ डिसेंबरला

नांदेड| श्री मध्वाचार्य मूल महासंस्थानांतर्गत श्री उत्तरादि मठाधिपती, श्री सत्यात्मतीर्थ स्वामीजींचे नांदेड येथे दि.२७ व २८ डिसेंबर या काळात वास्तव्य असून, विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
वायुदेवाचे हनुमान व भीमानंतर पूर्णावतार असलेल्या व वैष्णव संप्रदायाचे संस्थापक असलेल्या श्री मध्वाचार्यांच्या मूल महासंस्थानांतर्गत उत्तरादि मठाचे ४२ वे पीठाधिपती, श्री सत्यात्मतीर्थ स्वामीजींचे दि.२७ व २८ डिसेंबर याकाळात नांदेडमध्ये वास्तव्य असून, त्यांच्या उपस्थितीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
२७ डिसेंबरला सायंकाळी सहा वाजता श्री स्वामीजींचे श्रीनिवास गार्डन मंगल कार्यालयात, (गुरूजी चौकाजवळ) आगमन होत आहे. त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी, श्री उत्तरादि मठ नांदेडच्या वतीने करण्यात आली आहे. श्री स्वामींचे सर्व शिष्यगण दोन्ही दिवशी पारंपरिक वेशात उपस्थित राहतील. या दोन दिवसांत, पादपूजा, तप्त मुद्राधारण, मंत्रोपदेश, वेदघोष, विद्वानांचे प्रवचन, संस्थान महापूजा, श्री स्वामींचा अनुग्रह संदेश, तीर्थप्रसाद आदी कार्यक्रम होणार आहेत.
श्री उत्तरादि मठाच्या तामिळनाडूतील तिरूकोयलूर पासून अयोद्धेसह, उत्तराखंडातील श्री बद्रीनाथपर्यंत भारतभर सर्वदूर शाखा आहेत. प्रत्यक्ष ब्रह्मदेवांनी पूजलेल्या राम व सीता यांच्या सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग, अशा चारही युगात पूजल्या जाणार्या दिव्य मूर्तीच्या दर्शनाचा हा अलौकिक सोहळा असणार आहे. या सोहळ्यासाठी सर्व ब्रह्मवृंदांनी पारंपरिक वेशात सहभागी व्हावे, असे आवाहन श्री उत्तरादि मठ नांदेडचे व्यवस्थापक, पं.महिदासाचार्य धर्माधिकारी यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
