नांदेड| जगभरातील थोर व्यक्तींची चरित्रे अभ्यासली तर दिसते की त्यांचे प्राथमिक व शालेय शिक्षण मातृभाषेतून झाले आहे. मातृभाषेतील शिक्षणामुळे विविध ज्ञानक्षेत्रांचा पाया पक्का होतो. त्यामुळे मायबोली मराठीमध्ये जाणीवपूर्वक शिक्षण घेण्याची आवश्यकता आहे. समाजाने त्यासाठी पुढे आले पाहिजे, असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांनी मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या उद्घाटन प्रसंगी केले.
भाषा वाङ्मय व संस्कृती अभ्यास संकुल, ज्ञान स्त्रोत केंद्र आणि ललित व प्रयोगजीवी कला संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठात मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रंथ प्रदर्शनाने पंधरवड्याचे उद्घाटन झाले. ज्ञान स्त्रोत केंद्रात आयोजित ग्रंथ प्रदर्शनास प्र-कुलगुरू डॉ. माधुरी देशपांडे, प्र. कुलसचिव डॉ. शशिकांत ढवळे, अधिष्ठाता डॉ. पराग खडके, डॉ. चंद्रकांत बाविस्कर, डॉ. डी. एम. खंदारे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. शैलजा वाडीकर, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, कार्यकारी अभियंता तानाजी हुसेकर, भाषा संकुलाचे संचालक डॉ. रमेश ढगे, ज्ञान स्त्रोत केंद्राचे संचालक डॉ. जगदीश कुलकर्णी, मराठी विभागप्रमुख डॉ. पृथ्वीराज तौर यांची उपस्थिती होती.
कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर अध्यक्षस्थानावरून आपल्या विवेचनात पुढे बोलताना म्हणाले की, ‘मराठीत बोलणे, लिहिणे विचार करणे आणि मराठीचे संवर्धन व प्रसार करणे’ हे महाराष्ट्रीय माणसांचे कर्तव्य आहे. विद्यापीठाच्या वतीने मराठीच्या विकासासाठी आगामी काळात ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात येईल व त्यात शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह नामवंत साहित्यिकांना निमंत्रित करण्यात येईल असेही कुलगुरू डॉ. महानवर म्हणाले.
ग्रंथ प्रदर्शनामध्ये मराठी भाषेसंदर्भातील विविध दुर्मिळ ग्रंथ तसेच कोशवाङ्मय ठेवण्यात आले आहे. हे ग्रंथ प्रदर्शन दोन दिवस सुरू राहणार आहे. ग्रंथ प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी ग्रंथालयातील कर्मचारी डॉ. अरुण हंबर्डे, गणेश लाटकर, विठ्ठल मोरे, संदीप डहाळे यांच्यासह इतरांनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पृथ्वीराज तौर यांनी केले तर शेवटी डॉ. जगदीश कुलकर्णी यांनी आभार मानले. यावेळी डॉ. दिलीप चव्हाण, डॉ. योगिनी सातारकर प्रा. झिशान अली, डॉ. अनुराधा पत्की, प्रा. राहुल गायकवाड, प्रा. नामदेव बोम्पीलवार, प्रा. अभिजीत वाघमारे यांच्यासह आधिकारी, कर्मचारी, संशोधक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा सल्लागार समितीचे सदस्य व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील मराठी विभागप्रमुख डॉ. पृथ्वीराज तौर व डॉ. पी. विठ्ठल यांचा कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांच्या हस्ते मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त ग्रंथभेट देऊन विशेष सत्कार करण्यात आला.